नवेखेड : जवळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार एक रकमी एफआरपी जाहीर करीत आहेत. या उलट सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोंडावर बोट ठेवून बॉयलर प्रदीपन करीत आहेत.ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी आपपले बॉयलर प्रदीपन केले. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीची मागणी करीत रान तापवायला सुरवात केली आहे. परंतु साखर कारखानदार एकरकमीसाठी राजी नसल्याचे चित्र आहे. तीन टप्प्यात एफआरपी असा मनसुबा आहे.
सांगली जिल्ह्यात सोनहिरा, हुतात्मा, राजारामबापू, विश्वास, क्रांती, दत्त इंडिया, दालमिया शुगर हे कारखाने चांगल्या दरासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यातील कोणत्याच कारखान्याने अद्याप एकरकमी एफआरपीची घोषणा केलेली नाही. काही कारखान्याची मागील वर्षाची एफआरपी थकीत आहे. तीही मिळालेली नाही, ती मिळावी अशी मागणी आहे. तसा आदेश शेतकरी संघटनांकडे आहे. सुरवात कोणता कारखाना करणार याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून आहे.
कोरोना, पाठोपाठ आलेला महापूर यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. कृष्णा वारणा नदीकाठावरील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. एकरकमी एफआरपी मिळावी, अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सार्वत्रिक भावना आहे. परंतु जिल्ह्यातील कोणत्याच कारखानदाराने भाष्य केलेले नाही सांगली जिल्ह्यात ही अवस्था असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र एक रकमी एफआरपीची घोषणा करीत बॉयलर प्रदीपन केले आहे. त्यात शाहू (कागल), व वारणा (वारणानगर) कारखान्याचा त्यात समावेश आहे.
संघटनांचा सवतासुभा...
दुसरीकडे स्वाभिमानी, रयत क्रांती, बळीराजा, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनांचे एकरकमी एफआरपीसाठी व मागील हंगामाची एफआरपी पूर्ण करावी, यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. एकरकमी एफआरपीचा तिढा लवकर न मिटल्यास चालू गळीत हंगामावर परिणाम होऊ शकतो.
एकरकमी एफआरपी घेणारच. शिवाय २०१८-१९ व २०१९-२० मधील थकीत एफआरपीचे व्याज मिळावे, यासाठी आग्रही राहू.
-बी. जी. पाटील, बळीराजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.