आशांना आता होमिओपॅथी गोळ्या वाटण्याचे काम

 Asha now distributes homeopathic pills
Asha now distributes homeopathic pills
Updated on

कोल्हापूर : ही भगिनी दारात येते, तिच्या हाती पॅड, पेन. ती घरातल्या सर्वांची आरोग्यविषयक माहिती घेते. आता तर तिच्या हाती होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांची डबी असते. ती प्रत्येकाच्या घरात डबी देते. औषध कसे घ्यायचे, याची माहिती देते. अनेकजण या भगिनीला औषधाबद्दल उलटसुलट प्रश्‍न विचारतात.

तिला त्यातले फारसे वैद्यकीय ज्ञान नसते. मग ती एक छापील पत्रक हाती देते. आपले नाव, फोन नंबर लिहून घेते. आणि "साहेबांचा फोन आला तर गोळ्या मिळाल्या, म्हणून सांगा' असे काकुळतीने सांगून ही भगिनी पुढच्या घरात जाते. 
ही भगिनी आहे, आशा कर्मचारी. यांना कोणी काम सांगत नाही, तो आळशी, अशीही यांची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण करणे, माहिती घेणे, ती सादर करणे, या कामासाठी त्यांना रोज तीस, होय तीस रुपयेच मिळतात. दोन महिने हे पैसेही त्यांना मिळालेले नाहीत. तिसरा महिना संपत आला आहे. या महिन्याचे पैसे कधी मिळणार? हे ही त्यांना माहिती नाही; पण त्या राबत आहेत आणि त्यातही भर म्हणून प्रत्येक घरात जाऊन प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या होमिओपॅथीच्या गोळ्या वाटण्याचे आणखी एक काम त्यांच्यावर आले आहे. 
इतरांची प्रतिकार क्षमता वाढवण्याच्या या गोळ्या वाटून वाटून त्यांना आजारी पडायची वेळ आली आहे. विशेष हे, की या गोळ्या वाटण्याचे काम आशा कर्मचाऱ्यांनी करण्यासंदर्भात कोणतेही शासकीय आदेश नाहीत. 

शहरात 92 आशा कर्मचारी आहेत. नवीन 100 घेतल्या आहेत; पण त्यातील निम्म्या हजर नाहीत. त्यांना पगार महिना दोन हजार रुपये आहे. कोरोना सर्वेक्षणासाठी रोज 30 रुपये जादा देण्यात येणार आहेत. या आशा भगिनींवर कामाची जबाबदारी आहे. हे काम असे आहे की त्यांना घरात किंवा ऑफिसात बसून हे काम करताच येत नाही. प्रत्यक्ष घराघरात जाऊनच माहिती घ्यावी लागते. घरी येऊन गेल्याचा पुरावा म्हणून घराच्या भिंतीवर, दरवाज्यावर सांकेतिक खूण करावी लागते. जवळजवळ 65 प्रकारची कामे या आशा भगिनी करतात. आता तर त्यांच्यावर प्रत्येक घरात जाऊन होमिओपॅथी गोळ्या वाटण्याची जबाबदारी दिली आहे. या गोळ्या प्रत्येक घरात जाऊन दिल्याचा पुरावा म्हणून ज्या घरात त्या जातात त्यांचा मोबाईल नंबर, नाव घेतात. वरिष्ठांना देतात, मग त्यातल्या काही नंबरवर फोन करून वरिष्ठ आशा कर्मचारी त्या घरात येऊन गेली, की नाही याची खात्री करतात. आता होमिओपॅथी गोळ्या वाटण्याचे काम त्यांच्यावर आहे. या गोळ्यांत औषधी घटक काय आहेत. त्याचा परिणाम काय आहे?. हे आशा कर्मचाऱ्यांना माहिती नाही; पण लोक त्यांना उलटसुलट प्रश्‍न विचारतात. मग साहेबांनी सांगितले म्हणून हे काम आम्ही करतो, असे म्हणत एक छापील पत्रक व औषधाची डबी प्रत्येक घरात देऊन बाहेर पडतात. 
आपल्याकडे आधीच 62 कामे. त्यात हे घरोघरी जाऊन गोळ्या वाटण्याचे काम आशा भगिनींना मान्य नाही; पण त्या हे काम करत आहेत. मात्र, परिस्थितीने मेटाकुटीला आलेल्या या भगिनींना किती काम सांगायचे, हे एकदा निश्‍चित करण्याची गरज आहे. आहे ती नोकरी टिकविण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना हे काम निमूटपणे करावेच लागणार आहे; पण कोणीतरी त्यांच्या मेटाकुटीच्या आयुष्यात लक्ष घालण्याची गरज आहे. 

दोन महिने कोरोना कामाचा रोज 30 रुपये असलेला भत्ता मिळालेला नाही. या महिन्याचा कधी मिळेल माहिती नाही. जरूर आम्हाला काम सांगा; पण भगिनींना किती पगार मिळतो आणि त्यांना आपण किती काम सांगतो, याचा प्रत्येकाने विचार करावा. कामाचा ताण आहे; पण पुरेसा पगार नसताना कसे काम करतो, हे कोणी पाहणार आहे की नाही? हाच प्रश्‍न आहे. 
- ज्योती तावरे, शहर आशा कर्मचारी संघटना. 

दुपारी बारा, एक नंतर कोणाच्या घरात माहिती घ्यायला गेलो तर कोणी प्रतिसाद देत नाही. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी कशाला आलात म्हणून लोक विचारतात. आम्ही सरकारी आदेशानुसार काम करत असतो; पण राबणूक मोठी पगार कमी आणि अवमानच वाट्याला येतो. आशा कर्मचारी काय काम करतो आणि किती पगार आम्हाला मिळतो. हे कोणीतरी पहावे. 
- नेत्रदीपा पाटील , जिल्हा आशा कर्मचारी संघटना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.