Political: ‘उत्तर’ची भाजपची रणनीती; महेश जाधव, कदम, चुयेकर चर्चेत

महाविकास आघाडीत ‘उत्तर’च्या जागेबाबत कोणता निर्णय होणार, यावर भाजपचा अंतिम उमेदवार ठरणार
Election
Electionsakal
Updated on

कोल्हापूर : राज्यातील यापूर्वीचा विधानसभा पोटनिवडणुकांचा इतिहास पाहता कोल्हापूर (Kolhapur) उत्तरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नक्की असणार आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav)उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. याचबरोबर माजी नगरसेवक सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट उमेदवारी जाहीर केली. या दोघांशिवाय अन्य काहींनी उमेदवारीची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या जागेवर २०१९ मध्ये काँग्रेसचे आमदार (कै.) चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. (कै.) जाधव यांचे २ डिसेंबरला निधन झाल्याने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत ‘उत्तर’च्या जागेबाबत कोणता निर्णय होणार, यावर भाजपचा अंतिम उमेदवार ठरणार आहे.

Election
कोल्हापूर : एसटीचे खासगीकरण सुसाट

उत्तरची पोटनिवडणूक लढवावी, असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनीच धरला आहे. त्यात भाजपचे राज्यात १०६ आमदार असूनही त्यांना डावलून राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी संधान बांधल्याचा राग भाजप कार्यकर्त्यात आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट असूनही राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपने जागा जिंकली आहे. यावरून सर्वच मतदारसंघात सहानुभूतीची लाट असेलच, असे नाही, असा एक अनुमान भाजपच्या नेतृत्वाने काढला आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्‍थितीत ही जागा लढवायची, यावरही नेतृत्व ठाम आहे.

(कै.) जाधव हे निवडणुकीपूर्वी भाजपसोबत होते. त्यांच्या पत्नी जयश्री व भाऊ संभाजी हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यातून श्रीमती जाधव यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांची भेट घेऊन प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. त्यातून मग दुसऱ्या प्रबळ उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.

सध्या तरी भाजपकडे प्रबळ उमेदवार दिसत नाही. महेश जाधव प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवून ४४ हजारांवर मते घेतली आहेत. मूळ भाजपचे ही एक त्यांची जमेची बाजू आहे. माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोशल मीडियाद्वारे उमेदवारी जाहीर केली. संधी दिल्यास रिंगणात उतरण्याची त्यांची तयारीही आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांना ४५ हजार मते पडली आहेत. याशिवाय, माणिक पाटील-चुयेकर यांनीही श्री. पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली.

भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव

जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांना जिल्ह्यासाठी वेळ आणि सामग्रीही देण्यावर मर्यादा आहेत. अलीकडेच भाजपमध्ये आलेले माजी खासदार धनंजय महाडिक आणि कुटुंबीय यांच्याकडे यंत्रणा आणि ‘मॅनपॉवर’ही आहे, पण त्यांचे नेतृत्‍व मूळ भाजपवासीयांना पचनी पडेल का, याविषयी प्रश्नचिन्ह आहे.

पुढच्या राजकारणाचा शब्द

महापालिका निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजप रिंगणात उतरणार आहे. उमेदवारी घेऊन ‘बळीचा बकरा’ व्हायचे का? अशीही काही तुल्यबळ उमेदवारांची भावना आहे. पण, उमेदवारी घेतली आणि त्यात काहीही झाले तर पुढच्या विधानसभेसह भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ देऊन एखाद्याला उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.