माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती बिंदू चौकात यात्रेच्या उद्घाटनापूर्वी आले होते. दोघांच्याही गळ्यात भगवा स्कार्फ होता.
कोल्हापूर : पारंपरिक पोषाख परिधान केलेले शहरवासीय, भगवे ध्वज-फेटे-स्कार्फ-टोप्या, पारंपरिक वाद्ये व आधुनिक ध्वनी यंत्रणेचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि ‘जय श्री राम’ चा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात सकल हिंदू समाजाने (Hindu Community) रविवारी सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढली. यात्रा मार्गावर शहरवासीयांनी शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले.
उंट, घोडे यांच्या लवाजम्यासह निघालेल्या यात्रेतील श्री रामांचा रथ तसेच राममंदिराची प्रतिकृती लक्षवेधक होती. अयोध्येतील श्री राम प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (Ayodhya Ram Mandir) शोभायात्रेचे आयोजन केले होते. बिंदू चौकात करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शौमिका महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे, सत्यजीत कदम, संताजी घोरपडे प्रमुख उपस्थित होते.
रस्त्यावर ठिकठिकाणी भगवे ध्वज व श्री रामांचे फलक लावले होते. यात्रमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व त्यासमवेत पायी असणारे मावळे वातावरण भारून टाकत होते. त्या पाठोपाठ एका बग्गीमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते बसले होते. त्यांच्या समोर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जात होती तर ढोलताशा पथक, धनगरी ढोल, हलगी-घुमके, लेझीम पथक, संबळ पथकांच्या निनादाने यात्रा मार्ग दुमदुमून गेला होता. त्याचबरोबर वासुदेव, पोतराज, कडकलक्ष्मी, वाघ्यामुरळी लोककलाकारांनीही कला सादर केली.
पारंपरिक वेषात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे, श्री राम लिहिलेल्या टोप्या, स्कार्फ परिधान केले होते. हातात ध्वज घेऊन ‘जय श्री राम’ चा अखंड जयघोष केला जात होता. त्यात महिला, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. रामरथासमोर वारकऱ्यांच्या भजनी मंडळाकडून भजन सादर केले जात होते. महाद्वार रोड रहिवासी व व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांनी महाद्वार रोडवर पणत्या लावत स्वागत केले. तसेच हिंदू युवा प्रतिष्ठानने रामरक्षाची पुस्तकांचे वाटप केले. न्यू गुजरी मित्र मंडळाच्या वतीने प्रसाद वाटप केले.
अनेक ठिकाणी रांगोळी व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. बिंदू चौकातून सुरू झालेली यात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक करत दसरा चौकात आली. यावेळी कृष्णराज महाडिक, सुनील कदम, अनिरूद्ध कोल्हापुरे, मुकुंद भावे, राजाराम शिपुगडे, डॉ. सूर्यकिरण वाघ, किरण नकाते, शामराव जोशी, प्रमोद जोशी, किशोर घाटगे, संग्राम निकम आदी उपस्थित होते.
ध्वनी यंत्रणेवर लावण्यात येणाऱ्या श्री रामांच्या गाण्यांवर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), तसेच इतर कार्यकर्त्यांना ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. बिंदू चौकातही जय श्रीरामबरोबर जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणाही दिल्या.
माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती बिंदू चौकात यात्रेच्या उद्घाटनापूर्वी आले होते. दोघांच्याही गळ्यात भगवा स्कार्फ होता. त्यांची व खासदार महाडिक यांची समोरासमोर भेट झाल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केले. खासदारांनी मालोजीराजेंच्या भगव्या स्कार्फकडे पाहात विचारल्यानंतर मालोजीराजेंनीही लगेचच हा भगवा छत्रपतींपासून असल्याचे स्पष्ट केले. खासदार महाडिक, मधुरिमाराजे यांनीही एकमेकांना नमस्कार केला, तर सत्यजित कदम तिथून जाताना मालोजीराजेंनी हसत त्यांच्या पाठीवर थाप मारली. मालोजीराजे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.