सविस्तर चर्चेनंतर नेत्यांची एकत्रित मोट बांधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
वारणानगर : वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक जोरात होणार असल्याची चर्चा झाली. वारणा दूध संघाच्या विश्रामगृहावर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जनसुराज्यचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.
चर्चेचा तपशील मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना भ्रमणध्वनीवरून कळविला. सविस्तर चर्चेनंतर नेत्यांची एकत्रित मोट बांधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आमदार डॉ. कोरे असल्याने वडगांव बाजार समितीही बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती; पण काँग्रेस, शिवसेनेच्या विरोधातच कोरेंनी मोट बांधल्याचे आज सिद्ध झाले.
आमदार कोरे यांच्या मध्यस्थीने विधान परिषद निवडणुकीतील महाडिक व पाटील यांच्यातील टोकाचा संघर्ष मिटला होता याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असताना वडगांव बाजार समितीच्या माध्यमातून नव्या समीकरणाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे बॅंकेत एकत्र असणारे वडगांव बाजार समितीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
बैठकीस माजी सभापती शहाजी पाटील, सुरेश पाटील, विलास खानविलकर, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, संचालक अभय काशमीरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणेचे संचालक
उदयसिंह पाटील, प्रदीप देशमुख, राजवर्थन मोहिते उपस्थित होते.
सहा गटांची मोट....
हातकणंगले मतदारसंघात जनसुराज्यच्या विरोधात काँग्रेस व शिवसेना असल्याने दोन्ही पक्षांशी युती म्हणजे कोरेंना धोका पत्करणे होते. महाडिक, शेट्टी यांचेही काँग्रेस व शिवसेनेशी जुळत नसल्याने सर्वांची मोट बांधण्यात कोरे यशस्वी झाले.
महाडिकांना आधार
विधान परिषद बिनविरोध करण्यात कोरेंनी पुढाकार घेतला आणि अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागली. सध्या महाडिकांची वडगांव बाजार समितीवर सत्ता आहे. महाडिकांना कोरेसह अन्य नेत्यांची रसद मिळाल्याने महाडिक गटाला संजीवनी मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.