नाराजी थोपवण्याचे "गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

 Challenge to the authorities of "Gokul" to quell resentment
Challenge to the authorities of "Gokul" to quell resentment
Updated on

कोल्हापूर ः जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) एकमेव निवडणूक होणार असल्याने विरोधकांना सत्ताधाऱ्यांविरोधात ताकदीने उतरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाताना ठराव प्रक्रियेवेळी बंडखोरी करत नाराजी व्यक्त केलेल्यांना सोबत घेणे हे सत्ताधाऱ्यांसोबतचे मोठे आव्हान असणार आहे. यात राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे. 
राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या. त्यात जिल्हा बॅंकेचाही समावेश आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक लागली असती तर "गोकुळ' च्या सत्ताधाऱ्यांना तडजोडी करण्यात फारशी अडचण आली नसती. आता बॅंकेची निवडणूक पुढे गेल्याने श्री. मुश्रीफ यांचे "गोकुळ' च्या निवडणुकीतील महत्त्व वाढणार आहे. 
पाच वर्षापुर्वी श्री. मुश्रीफ यांनी अनपेक्षितपणे सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. पण त्यानंतरच्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी श्री. मुश्रीफ यांनाच किंमत दिली नसल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करतात. पण "गोकुळ' मध्ये तडजोड करून बॅंक बिनविरोध होत असेल तर श्री. मुश्रीफ यांनीही संघाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्याशी तडजोड करण्याची भुमिका स्विकारली होती. त्यासंदर्भात एक बैठकही झाली पण दुसरी बैठक होण्यापुर्वीच फक्त "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे श्री. मुश्रीफ - पीएन. यांची भेट व त्यात होणारा निर्णय "गोकुळ' च्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरणार आहे. 
"गोकुळ' च्या ठराव प्रक्रियेवेळीच ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, विश्‍वास पाटील यांच्यासह शशिकांत पाटील यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल करून आपला इरादा स्पष्ट केला होता. डोंगळे-पाटील यांचा राग पी. एन. यांच्यापेक्षा माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यावर आहे. त्यातूनच पंधरा दिवसांपुर्वी या दोघांनी पी. एन. यांची भेट घेऊन जायचे कोणासोबत याचे सर्वाधिकार त्यांना दिले. या भेटीत श्री. मुश्रीफ यांचा पाठिंबा मिळवणे हे केंद्रस्थानी होते. त्यादृष्टीने पी. एन. यांनीही श्री. मुश्रीफ यांच्यासोबत चर्चेचा सिलसिला सुरू ठेवला आहे. तथापि पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र सत्ताधाऱ्यांविरोधात मोठी मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात सत्तारूढ गटाचे किती नाराज संचालक त्यांच्या हाती लागणार यावर मोर्चे बांधणीचे गणित अवलंबून आहे. 
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव झाला, या पराभवामागे कोण होते हेही लपून राहीलेले नाही. पण तेव्हापासून श्री. नरके यांची "गोकुळ' विरोधाची धारही बोथट झाल्याचे दिसते. माजी आमदार संजय घाटगे यांनी जाहीरपणे श्री. मुश्रीफ यांचे कौतुक करताना पी. एन. हेही आपले नेते असल्याचे सांगितले आहे. अशा नाराजांना आपल्यासोबत कसे घेणार यावर विरोधकांचे पॅनेल अवलंबून आहे. 


तडजोडीत अडथळाही 
"गोकुळ' च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना श्री. मुश्रीफ हवेत पण पालकमंत्री पाटील यांना त्यांचा विरोध आहे. तर श्री. मुश्रीफ यांना "गोकुळ' च्या राजकारणात महाडीक नको आहेत. उघडपणे यावर कोण बोलत नसले तरी चर्चेच्या अनुषंगाने जे मुद्दे समोर येत आहेत,त्यात हा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. संघातील संचालक पदाच्या तीन जागा वाढल्या असल्या तरी त्या द्यायच्या कोणाकोणाला हाही कळीचा मुद्दा तडजोड करताना आहेत. त्यामुळे ही चर्चा किती यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.

 
संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.