सांगली : राज्य सरकार हे पोलिस आणि गुंडांच्या बळावर सुरु आहे. या पद्धतीविरुद्ध लढण्यासाठी आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाले पाहिजे. ॲटॅक इज बेस्ट डिफेन्स हे लक्षात घ्या. वकिलांची फौज तयार करा, नोटीस आली तर प्रतिनोटीस द्या, याचिका दाखल करा. गेल्या २२ महिन्यांत हे सरकार एकही खटला जिंकू शकलेले नाही, ते नामोहरम होत आले आहे, अशी जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘महाविका आघाडीतील तीन पक्षांची सध्या शेवटची फडफड सुरु आहे. भाजप ऐकत नाही म्हटल्यावर आपल्या कारखान्यांना मदत न करणे, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, असे प्रकार सुरु आहेत. त्यांचे सल्लागार चुकीचे आहेत. हे करून लोक फुटतील, असे त्यांना वाटले होते. पण, २२ महिन्यात भाजपचे कुणी फुटलेले नाही. उलट आशाताई बुचके, कृपाशंकर सिंह, तृप्ती सावंत असे महत्वाचे नेते भाजपमध्ये आले आहेत. आता आपण आता शांत राहून चालणार नाही. ॲटॅक करावा लागेल. केस अंगावर घ्यायला घाबरू नका. जितक्या जास्त केस, तितकी राजकीय पात्रता उजळून निघते.’’
ते म्हणाले, ‘‘नारायण राणे यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले होते, हा मुद्दा बाजूला पडला. खरे तर तो चर्चेत यायला हवा होता. मुख्यमंत्र्यांना देशच्या स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव की अमृतमहोत्सव माहिती नसावे, हे गंभीर नाही का? त्यामुळे राज्यभरातून ७५ हजार पत्रे पाठवून मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव आम्ही करून देणार आहोत.’’
राणे शिवसेनेच्या धाटणीत तयार झालेत
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘नारायण राणे हे शिवसेनेच्या मुशीत तयार झाले आहेत. मारेन, तोडेन, फोडणे ही तिकडचीच भाषा आहे. ते त्यांच्या स्टाईलने बोलतात. तुम्ही बोलणार आणि ते कसे गप्प बसतील. त्यामुळे बाहेरून भाजपमध्ये आलेले बोलतात आणि आम्ही मूळ भाजपचे गप्प बसतोय, असे विधान करून आमच्यात फूट पाडण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असेल तर ते चुकत आहेत. आम्ही हुशार आहोत, राजकारण नवे नाही. त्यांना वाटत असेल एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणारी भाजप असेल तर नीट माहिती घ्या. आम्हीही आक्रमक आहोत. गप्प बसणार नाही.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.