Kanhaiya Kumar criticize ajit pawar
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये काँग्रेसने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाण्यावरुनही त्यांनी टीकास्त्र डागले. ईडी आता अजित पवारांच्या घरचा रस्ता विसरली आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत नव्हते तोपर्यंत ते भ्रष्टाचारी होते. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवारांवर ७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. आता ईडी झोपची गोळी खाऊन झोपली आहे. ती आता अजित पवारांच्या घराचा पत्ताही विसरली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील घराणेशाही संपवण्याची गोष्ट केली होती. यावरुनही कन्हैया यांनी मोदींना लक्ष्य केले. घराणेशाही भाजपकडे असली तर ती चांगली, दुसऱ्यांकडे असली तर ती वाईट, असं कसं, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. देशात स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काँग्रेस आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
व्हॉट्सअपवरच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते तुमच्यापर्यंत काहीही पोहोचवतील. काहीही खोटं सांगतील. अब्दुलला ११ भाऊ-बहीण आहेत. देशात मुस्लिमांची संख्या वाढतीये. काही काळात त्यांचेच सरकार येऊन शरिया कायदा लागू होईल. संविधान नष्ट होईल. देशात लोकशाही राहणार नाही, असं म्हणत ते घाबरवण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही घाबरु नका. आपल्या विचारांवर ठाम रहा, असं कन्हैया म्हणाले.
तुमचं लक्ष खोट्या गोष्टींवरुन हटू नये यासाठी ते प्रयत्न करतील. तुम्हाला काहीही सांगून लक्ष विचलीत करतील. पण तुम्ही आपल्या विचारावर ठाम रहा. भाजप तुमच्यासमोर खोटा इतिहास मांडेल. पण, तुम्ही त्याला बळी पडू नका, असं कन्हैया कुमार म्हणाले. (Marathi Latest News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.