सांगली : विधानसभेचे गतवेळचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि युवा नेते विशाल पाटील यांच्यात एका कार्यक्रमात मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांनी या टोलेबाजीत शिरकाव करीत त्यात आणखीनच रंगत आणली. परंतु, संबंधितांनी एकमेकाला मारलेली कोपरखळी भविष्यातील घडामोडींची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवर कॉंग्रेस पक्षातील संघर्ष पाहायला मिळाला होता. विधानसभेची सांगलीची जागा काँग्रेसला थोडक्यात गमवावी लागली. सध्या निवडणुकीला बराच अवकाश आहे. परंतु, इच्छुकांनी आतापासूनच सुरू केलेली तयारी लपून राहिलेली नाही. त्याची झलक स्वातंत्र्यदिनी झालेल्या एका विकासकामाच्या प्रारंभी पाहायला मिळाली. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या बालोद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ही चर्चा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने घडली.
पालकमंत्री पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी विशाल पाटील यांना आग्रह केला. मात्र, विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना हा मान देऊ केला. त्यावर जयंतरावांनी पृथ्वीराज यांना नारळ फोडण्यास सांगितले. ते नारळ फोडण्यासाठी पुढे येताच विशाल पाटील ‘सगळे नारळ फोडण्याचे काम पृथ्वीराजबाबांनी करावे आणि ऐनवेळी उमेदवारी आपणाला मिळो’, असे मिश्किलपणे म्हणाले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
पालकमंत्री पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी विशाल पाटील यांना आग्रह केला. मात्र, विशाल पाटलांनी पृथ्वीराज पाटील यांना हा मान देऊ केला.
पृथ्वीराज यांनी हजरजबाबीपणा दाखवत ‘ती मिळो, पण लोकसभेची मिळो’ अशा शुभेच्छा दिल्याने हास्यकल्लोळ झाला. तेवढ्यात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी त्यात उडी घेत सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीचा यंदा दावा असल्याचे सांगताच पुन्हा हशा पिकला. गमती-जमतीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला असला, तरी भविष्यात विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून अंतर्गत वाद रंगणार असल्याची चिन्हे उपस्थितांना पाहायला मिळाली. पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभेतील निसटत्या पराभवानंतर पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे; तर विशाल पाटीलही सतर्क झाले असून, त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे दोघांची सुप्त इच्छा एकप्रकारे दिसून आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.