कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीचे जोडे पुसू लागल्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेतली. अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही म्हणून आम्ही बाहेर पडल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोकणातील बारसू प्रकल्पासाठी ठाकरे यांनीच पंतप्रधानांना पत्र दिले होते. आता तेच विरोध करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘उध्दव ठाकरे चुकीचे बोलून स्वत:ची किंमत कमी करुन घेत आहेत. बारसू हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे. तो महाराष्ट्राबाहेर नेऊ नये, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती. हा पर्यायवरणपूरक प्रकल्प आहे असे सांगून उध्दव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. केवळ राजकारणासाठी ते आता याच प्रकल्पाला विरोध करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेले म्हणून आदित्य ठाकरे खोटे बोलत फिरत आहेत.
या प्रकल्पातून एक थेंबही पाणी बाहेर पडत नाही. प्रदूषण होत नाही. आंबा, काजू, नारळाला धोका बसणार नाही. माशांवर याचा परिणाम होणार नाही. हा जनतेचा प्रकल्प आहे. आंदोलकांना चर्चेचा मार्ग खुला केला आहे. चर्चेतून हा प्रश्न सोडवता येणार आहे. मेट्रोसाठी तुम्हीच आडवे पडला. कोणत्या टोकाला जावून विरोध करता हे लक्षात घेतले पाहिजे. खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
दरम्यान, जमिनीबाबतची कागदपत्रे तसेच शासकीय दाखले मिळत नाहीत, अशा तक्रारी होत्या. याबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्या त्या विभागाला दिल्या.
७५ हजार नागरिकांना थेट लाभ ः डॉ. श्रीकांत शिंदे
“जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” हा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असे उद्दीष्ट आहे. प्रशासकीय अधिकारी हे काम करतीलच. पण शिवसैनिकांनाही याचा नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आबिटकर, महेश शिंदे, जिल्हा प्रमूख सुजीत चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
‘जिल्हाधिकारी बदलीचे रॅकेट असेल तर दाखवून द्या’
माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कोट्यवधींची उलाढाल होते, असा आरोप केला होता. याबद्दल मंत्री केसरकर यांनी असे कोणतेही रॅकेट असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन केले
‘उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला’
काँग्रेस, राष्ट्रवादीचे ऐकून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ते राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहेत. मात्र, भाजपला त्यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
‘शरद पवारांशिवाय अजित पवार बोलणार नाहीत’
शरद पवार हे भाकरी परतावी लागते असे बोलतात. अजित पवार जे करतात ते शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय करणार नाहीत, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.