कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४० गट येतात, यापैकी १७ सदस्य काँग्रेसचे आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांतील सदस्य, विधानसभा, विधान परिषदेतील आमदारांची संख्या पाहता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क असल्याचा दावा मुंबईत झालेल्या पक्षाच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
माजी मंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके, पक्षाचे सचिव बाजीराव खाडे यांच्या नावांवरही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जो उमेदवार देईल, त्याच्या मागे काँग्रेसने ताकद उभी केली आहे; पण त्यांच्या उमेदवारांनी नंतर पक्ष बदलले, हा त्यांचा प्रश्न असून, आता काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
वर्षभरानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा त्या-त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मुंबईच्या काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, आमदार विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, उल्हास पवार आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (Kolhapur Lok Sabha Constituency) १९९८ पर्यंत काँग्रेसकडेच होता. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर २००९ पर्यंत ‘राष्ट्रवादी’कडेच राहिला. मात्र, २००९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले दिवंगत सदाशिवराव मंडलिक हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते. त्यामुळे २०१४ मध्येच या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा होता; पण काही कारणाने त्यात यश आले नाही.
आता २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पक्षालाच रामराम केला; पण आघाडीत राष्ट्रवादीने जो उमेदवार दिला, त्याचा प्रामाणिक प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. किंबहुना, त्यांच्या विजयासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटले. याचा विचार लोकसभा मतदारसंघाचे राज्यस्तरीय वाटप होताना करावा, अशीही मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे ४० गट येतात, यापैकी १७ सदस्य काँग्रेसचे आहेत. यात चिन्हावरील सात, तर चार सदस्य काँग्रेसचे सहयोगी होते. याउलट ‘राष्ट्रवादी’चे आठ व सहयोगी एक असे नऊ सदस्य आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सहापैकी पाच सदस्य शिंदे गटात गेल्याने त्यांचा एकच सदस्य उरला आहे. याशिवाय, विधानसभेचे तीन, तर विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत, याचाही विचार काँग्रेसकडून या मतदारसंघावर हक्क सांगताना व्हावा, अशी अपेक्षाही या वेळी व्यक्त करण्यात आली.
कोल्हापुरातून या बैठकीसाठी माजी मंत्री जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजू आवळे, प्रा. जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजीराव खाडे, बाजार समिती सभापती भारत पाटील, रणजितसिंह माने-पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
या मतदारसंघातून काँग्रेसकडे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, ‘गोकुळ’ चेसंचालक चेतन नरके यांनी उमेदवारीची मागणी केल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी बैठकीत सांगितले. यातील श्री. नरके यांनी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आमदार पी. एन. पाटील यांना, तर पी. एन. यांनी सतेज पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी बैठकीत केली. यावरून बैठकीत चांगलेच हास्याचे फवारे उडाले. सतेज पाटील यांनी उल्लेख केलेले चेतन नरके मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघही पूर्वी काँग्रेसकडेच होता. आताही हा मतदारसंघ पक्षाकडे घेतल्यास तिथेही ताकदीने लढू, तसे उमेदवार पक्षाकडे आहेत, असा विश्वासही या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. हातकणंगलेतर्फे इचलकरंजीचे शशांक बावचकर, अमरसिंह यशवंत पाटील, हातकणंगलेचे तालुकाध्यक्ष जाधव, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांनी चर्चेत भाग घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.