अन् येथे थिजली माणुसकी! मृत्यूनंतरही मुलगा आला नाही जवळ ; शेवटी...

corona positive Relatives refused to perform the funeral in kolhapur
corona positive Relatives refused to perform the funeral in kolhapur
Updated on

कोल्हापूर - कोकणातला एक कोरोनाबाधित रुग्ण दोन दिवसांपूर्वी दगावला; मात्र नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. आज जिल्ह्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृतदेहाची सुमारे दोन ते तीन तास हेळसांड झाली... असे प्रकार आता वाढू लागले असून कोणत्याही जाती-धर्मातील बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याच्या अंत्यविधीची सर्वतोपरी जबाबदारी जिल्हा बैतुलमाल कमिटीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

कोरोनाचा संसर्ग बघता बघता बळावू लागला आणि आता त्याच बरोबरीने कोरोनाची भीती आणखी गडद होऊ लागली आहे. ही भीती इतकी वाढू लागली आहे, की त्यासमोर माणुसकीही थिजली असल्याचे स्पष्ट चित्र आता पाहायला मिळू लागले आहे.

कोल्हापूरचा विचार केला तर दररोज सीपीआर परिसरात कोरोनाबाधित मृतदेहांची हेळसांड होत असून, आज दुपारीही असाच एक प्रकार घडला. दोन ते अडीच तास मृतदेहाला हात लावायलाही नातेवाईक तयार नव्हते. इचलकरंजी येथील रवी जावळे यांनी याबाबतची माहिती नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना दिली. बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांनी श्री. मुल्लाणी यांच्यासह राजू नदाफ, जाफर मलबारी, जावेद सनदी, जाफर महात यांना तत्काळ पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन अंत्यविधी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार राजू नदाफ, जाफर मलबारी व महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून हिंदू पद्धतीने अंत्यविधी केले. यावेळी चाळीस ते पन्नास नातेवाईक उपस्थित होते. किमान अंत्यविधीवेळी नातेवाईकांनी पुढे यावे, अशी विनंती केल्यानंतरही त्याला नातेवाईकांनी नकार दिला. मृत व्यक्तीच्या मुलानेही मृतदेहाजवळ जाणे टाळले. 


अशीही मदत...
कोरोनाविरोधातील लढाईसाठी प्रशासनाला मुस्लिम समाजाने ६० लाख रुपयांची मदत देत येथील सीपीआर आणि इचलकरंजी येथे दोन अद्ययावत आयसीयू युनिट उभारली. जिल्ह्यात आजवर झालेल्या विविध आपत्तींच्या काळात किंवा अगदी मराठा क्रांती मोर्चावेळीही प्रशासन आणि इतर समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या समाजाने कोरोनाच्या लढाईतही सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोन्ही आयसीयू युनिटचे रमजान ईदच्या दिवशी लोकार्पण झाले. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीस लाखांची अद्ययावत सामग्री बैतुलमाल कमिटीने उपलब्ध केली आहे आणि त्याचा फायदा आता रुग्णांना होतो आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.