घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे कर्जाला कंटाळून दोन घनिष्ठ मित्रांनी एकाच झाडाच्या फांदीला एकाच नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. बाबासाहेब हिंदुराव मोरे (वय ४२), विनायक शिवाजी पाटील (वय ३८, दोघेही रा. जुने पारगाव पैकी बिरदेवनगर, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना आज (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास घडली. पेठवडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बाबासाहेब मोरे व विनायक पाटील हे बिरदेवनगर येथे एकमेकांशेजारी राहातात. दोघे जिवलग मित्र होते. एकाच मोटारसायकलवरून ते फिरत असत. विनायक पाटील यांचा ट्रकने चिरा ओढण्याचा व्यवसाय होता; तर बाबासाहेब मोरे यांची शेती व जनावरांचा गोठा आहे. दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणत व विक्री करीत.
नवे पारगाव पैकी विनयनगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमीच्या दक्षिण बाजूस असलेल्या वनविभागाच्या डोंगरात गर्द झाडी आहे. आज दुपारी एकच्या सुमारास बाबासाहेब व विनायक हे दोघेही मोटारसायकलवरून (एमएच ०९, सीएन १०६३) या जंगलात गेले. तेथील एका झाडाच्या खाली मोटारसायकल उभी केली.
त्यावर दोघे उभारले आणि त्याच झाडाच्या फांदीला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जास कंटाळून त्या दोघांनीही आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बाबासाहेब मोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे; तर विनायक यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा व दहा दिवसांची मुलगी आहे.
नवे पारगावच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती कांबळे यांनी उत्तरीय तपासणी केली. वडगावचे पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार जावेद रोटीवाले व रणवीर जाधव अधिक तपास करीत आहेत.
... आणि झाडाची फांदी मोडली
बाबासाहेब व विनायक हे मित्र नेहमी एकत्र असायचे. आत्महत्या करतानाही ते एकाच मोटारसायकलवरून घटनास्थळी गेले. झाडाच्या एकाच फांदीला दोघांनी एकाच नॉयलॉन दोरीने मोटारसायकलवर उभे राहून पायाने मोटारसायकल ढकलून गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. दोघांच्या वजनाने फांदीही मोडल्याचे घटनास्थळी पहायला मिळाले. या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
बिरदेवनगरात शोककळा
बिरदेवनगरातील या मित्रांच्या जाण्याने पाटील व मोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन कुटुंबांची वाताहत झाल्याने बिरदेवनगरात शोककळा पसरली. बिरदेवनगरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.