रुग्णालय प्रशासनाने कृष्णात पाटील यांच्या नातेवाइकांना मृत कृष्णातच्या मृतदेहऐवजी मुंबईतील व्यावसायिक सतीश रुईया (वय ७६) या व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिल्याचे कबूल केले.
प्रयाग चिखली : मुंबईतील एका नामवंत रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेहच बदलून कोल्हापुरात (Kolhapur) आल्याचे अंत्यसंस्कारावेळी लक्षात आले आणि स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. संबंधित रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थ, नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. बदलून आलेला मृतदेह सायंकाळी तातडीने मुंबईकडे पाठविण्यात आला.
वरणगे (ता. करवीर) येथील स्मशानभूमीत हा सारा प्रकार घडला. तेथील भैरवनाथ हायस्कूलचे (Bhairavnath High School) शिपाई कृष्णात पाटील (वय ४५) दहा दिवसांपासून आजारी होते. त्यांचा रक्तक्षयाचा आजार बळावल्यामुळे त्यांना मुंबई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेताना गुरुवारी (ता. २९) पहाटे त्यांचे निधन झाले.
त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांची पत्नी मेघा आणि भाऊ उपस्थित होते. घरातील कुटुंबप्रमुखाचा आकस्मिक मृत्यूचे दुःख पचवत नातेवाईक पाटील यांचा मृतदेह घेऊन मुंबई ते वरणगे असा सहा तासांचा प्रवास करून येथे पोहोचले. मृतदेह कापडामध्ये गुंडाळल्यामुळे अंत्यदर्शन घेऊन मृतदेह थेट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नेला. अंत्यसंस्कारासाठी हजारावर लोक स्मशानामध्ये जमले होते.
रितीरीवाजाप्रमाणे मृतदेहाला शेवटचे पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड हटवले. त्यावेळी हाइ मृतदेह कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे त्यांचा मुलगा प्रसाद याने ओळखले. ही बाब ग्रामस्थ व नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर स्मशानभूमीत एकच खळबळ माजली. उपस्थितांनी संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाला लोकांनी धारेवर धरले. तसेच रुग्णालयात संपर्क करून मृतदेह बदलल्याची घटना सांगितली. रुग्णालयाने झालेली चूक मान्य करून कृष्णात यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांनी यावे, असे सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने कृष्णात पाटील यांच्या नातेवाइकांना मृत कृष्णातच्या मृतदेहऐवजी मुंबईतील व्यावसायिक सतीश रुईया (वय ७६) या व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिल्याचे कबूल केले. रुग्णवाहिका रुईया यांचा मृतदेह घेऊन मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून मृतदेहाच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले लोक नातेवाईक सायंकाळी पाच वाजता माघारी फिरकले. या घटनेमुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांना प्रचंड मनस्ताप झाला. नातेवाइकांनी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. कृष्णात यांच्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा सुरू होती.
कृष्णात यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई असा परिवार आहे. ते हायस्कूलकडे शिपाई पदावर काम करत होते. अत्यंत कष्टातून संसार करत त्यांनी एका मुलाला डॉक्टर, तर दुसऱ्याला प्रशासकीय अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. एका मुलाने ‘बीएएमएस’ला प्रवेश घेतला आहे, मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.