पोटच्या पोराचा झालेला दुर्दैवी अंत पाहून आई वडील व नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
हुपरी : घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षीय बालकाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विराज अमोल मालवाने (रा.मूळगाव, अंबाईनगर, यळगूड. सध्या रा.पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, तळंदगे) असे मृत बालकाचे नाव आहे.
ही घटना काल सायंकाळी सातच्या सुमारास तळंदगे येथे पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत घडली. घटनेची नोंद हुपरी पोलिस (Hupari Police) ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, यळगूड येथील अमोल अशोक मालवाने हे एका कंपनीत दीड वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत.
तिथेच ते कंपनीच्या खोलीमध्ये पत्नी सुनीतासह रहावयास आहेत. त्यांना राजवीर (वय ६) व विराज (वय दीड वर्षे) अशी दोन मुले आहेत. अमोल सायंकाळी रात्रपाळीवर कामावर जाण्याआधी अंघोळीला गेले होते, तर पत्नी घरकाम करत होत्या. विराज हा मोठा भाऊ राजवीर याच्यासोबत अंगणात खेळत होता.
दरम्यान, विराज हा अंगणात दिसत नसल्याचे निदर्शास आले. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो आढळून आला नाही. अखेरीस घरापासून वीस ते पंचवीस फूट अंतरावर असलेल्या खड्डयात बघितले असता पाण्यामध्ये बुडबुडे येत असल्याचे दिसून आले. संशय बळावताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला.
त्यामुळे कंपनीमधील इतर कर्मचाऱ्यांनी खड्डयात उतरून विराज याचा शोध घेतला असता तो पाण्यात बुडाल्याच्या अवस्थेत आढळून आला. विराज याला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही क्षणापूर्वी अंगणात बागडत असलेल्या पोटच्या पोराचा झालेला दुर्दैवी अंत पाहून आई वडील व नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
कंपनीने पाणी साठवण्याच्या उद्देशाने शेजारीच मोठा खड्डा खणला आहे. त्यामध्ये पाणी भरलेले होते. त्यास कोणत्याही पद्धतीचे संरक्षक कुंपण नाही. खड्डा उघड्यावरच आहे. त्यामध्ये खेळता खेळता तोल जाऊन पडल्याने विराज याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.