कोरोनाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जडणघडणीलाच जणू ब्रेक लावला. त्यातून नवे सामाजिक प्रश्न निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
गडहिंग्लज (कोल्हापूर) : मुळातच शारीरिक व्यंगामुळे त्यांचा शैक्षणिक श्रीगणेशा उशिराच. वयाप्रमाणे शारीरिक वाढ होत असली तरी दिव्यांगामुळे बौद्धिक वाढ संथ. त्यामुळेच व्यवहाराचा संस्कार शिकवणाऱ्या शाळेच त्यांच्या दृष्टीने जीव की प्राण. मुख्यतः दिव्यांग मित्रातच ते खऱ्या अर्थाने रमतात. (disabled children have also been affected due to the closure of schools due to corona)
गतवर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून इतर शैक्षणिक संस्थाप्रमाणेच दिव्यांगांच्या शाळा पण बंद झाल्या. यात सामान्य विद्यार्थ्यांची ऑनलाईन शैक्षणिक वाटचाल सुरू राहिली. पण, कोरोनाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जडणघडणीलाच जणू ब्रेक लावला. त्यातून नवे सामाजिक प्रश्न निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
गेल्यावर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वच शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. पहिली ते नववीच्या परीक्षाही रद्द झाल्या. सप्टेंबरनंतर सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. चाचणी, सहामाही आणि वार्षिक परीक्षाही ऑनलाईन झाल्या. केवळ दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या.
मतिमंद मुलांच्या शाळा तर यंदा भरलीच नाही. निवासी शाळांत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वसतिगृहे बंदच राहिली. परिणामी, दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा ना ऑनलाईन ना ऑफलाईन भरली. कोल्हापूर जिल्ह्यात दिव्यांगांच्या आठ शाळा असून त्यात सुमारे ६०० विद्यार्थी शिकत आहेत.
इतर मुलांच्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा विकास शाळांच्या माध्यमातून अधिक होत असतो. ते सर्वसामान्यांसारखे इतरांत अधिक मिसळत नाहीत. कारण, दिव्यागं आपल्यासारख्या सख्यांतच अधिक खुलून जातात. केवळ शैक्षणिकच नव्हे तर जीवन उपयोगी कौशल्ये, सवयी या शाळांतूनच दिव्यांग विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पालणपोषणाच्या जबाबदारीला या शाळा मोठा हातभार लावतात. यामुळे सर्वांगीण विकासाचे मुख्य माध्यम असणाऱ्या शाळा म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दुसरे घरच आहेत. अशा शाळाच कोरोनामुळे बंद असल्याने दिव्यांग विद्यार्थ्यांची फरफट अधिक वाढली आहे.
मतिमंद मुलांचे प्रश्न जटील आहेत. शाळेच्या निमित्ताने त्यांना चांगल्या सवयीतून जीवन कौशल्ये शिकवली जातात. ग्रामीण भागातील पालकांना पाल्यांना सांभाळताना अमाप अडचणी आहेत. सतत घरी राहिल्याने एकाकीपणा वाढून अशा विद्यार्थ्यांकडून चुकीचे वर्तन घडण्याचे प्रसंग वाढल्याचे समोर येत आहेत.
- साताप्पा कांबळे, प्रमुख, मतिंमद विद्यालय
प्रारंभी मूकबधिर मुलांसाठी ऑनलाईनचा प्रयोग केला, पण बहुतांशी पालकांची नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे ही संकल्पना गुंडाळावी लागली. विद्यार्थी एकमेकांना भेटण्यासाठी कासावीस झाले आहेत. पण, कोरोनामुळे त्यांच्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर सर्वांगीण विकासाला फटका बसला आहे.
- हणमंत साठे, प्रमुख, मूकबधिर विद्यालय
दृष्टिक्षेप
- जिल्ह्यात ८ शाळा
- सुमारे ६०० विद्यार्थी
(disabled children have also been affected due to the closure of schools due to corona)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.