कोल्हापूर : डॉक्टरांच्या योगदानाला ‘सकाळ’चा सॅल्यूट

डॉ. तात्याराव लहाने; ‘सकाळ’तर्फे आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्काराचे दिमाखात वितरण
सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट हेल्थ केअर ॲन्ड वेलनेस अवॉर्डचे वितरण पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते हॉटेल सयाजी येथे झाले
सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट हेल्थ केअर ॲन्ड वेलनेस अवॉर्डचे वितरण पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते हॉटेल सयाजी येथे झालेSakal
Updated on

कोल्हापूर - कोरोना काळात डॉक्टरांनी रात्रीचा दिवस करून काम केले. धोका पत्करून रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडले. यात काहींचा मृत्यूही झाला. सर्वच डॉक्टरांच्या योगदानाला पुरस्कार देऊन ‘सकाळ’ने सॅल्यूट केला आहे. यातून ‘सकाळ’ने सामाजिक दायित्व निभावले आहे, असे गौरवोद्‌गार नेत्रशल्‍य विशारद आणि राज्याचे निवृत्त आरोग्य संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले. ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘हेल्थ केअर अँड वेलनेस’ विभागातील पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात हा सोहळा उत्साहात झाला.

समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला. त्यातून ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ ही संकल्पना पुढे आली. या अंतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, वेलनेस सेंटर, डाएटीशियन यांना पुरस्कार दिले. हृदद्य सोहळ्यात त्यांचा हा सन्मान केला. प्रशस्‍तिपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. सुरुवातीला गायक सीताराम जाधव यांनी भावगीतांची सुरेल मैफल रंगवली. संदेश गावंदे यांनी त्यांना तबल्याची साथ दिली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘नागरी समस्यांवरील बातम्या आणि समाजातील विविध प्रश्नांवर भूमिका घेणे हे प्रसारमाध्यमांचे काम आहे. त्याचबरोबर समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही देखील माध्यमांची जबाबदारी आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’ने लोकचळवळ उभी केली, त्यातून हजारो माणसे या कामासाठी एकवटली. सांगली जिल्ह्यात वृक्ष लागवडीची चळवळ सुरू केली. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणे हा याचाच एक भाग आहे. समाज आणखी उन्नत व्हावा, यासाठी हे प्रयत्न आहेत. दोन वर्षात डॉक्टरांचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले. या संकटात सर्वच डॉक्टरांनी मनापासून काम केले. सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी क्षमतेच्या पलीकडे जाऊन रुग्णांचे प्राण वाचवले. सकाळ माध्यम समूहाने त्‍यांच्याप्रती असणारी कृतज्ञता पुरस्‍कारातून प्रकट केली आहे. उपचार, शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण या गोष्टी कोल्हापूर सांगली परिसरात होऊ लागल्या आहेत. आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारामुळे विस्तारणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींना बळ मिळेल.’’

पद्मश्री डॉ. लहाने म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीला यावर नेमके कोणते उपचार करायचे? याबाबत अनभिज्ञता होती. मात्र स्थानिक पातळीवर सरकारी आणि खासगी डॉक्टर जीवाचा धोका पत्करून रुग्‍णसेवेसाठी उभे राहिले. या काळात कित्येक डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले. संकटाच्या काळात डॉक्टर उभा राहतो हे तुम्ही दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय चांगले काम केले. त्यामुळेच सुरुवातीला आपल्याकडे ऑक्सिजन बेडची संख्या कमी होती. आता ती चार लाखांच्या घरात पोहचली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ज्यांना पूर्वीपासून काही व्याधी आहेत अशांचे प्राण गेले. दुसऱ्या लाटेत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होती अशा रुग्णांना प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण जरी अधिक असले तरी मृत्यू कमी होते. कारण त्या विषाणूचे स्वरुप वेगळे होते. कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगता येणार नाही. मात्र जूनपर्यंत चौथ्या लाटेचा धोका नाही. सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली तर चौथ्या लाटेचाही सामना करता येईल.’’ ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले. ‘सकाळ’चे जनरल मॅनेजर (जाहिरात, रेस्ट ऑफ महाराष्ट्र) उमेश पिंगळे, उप सरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, ‘सकाळ’च्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, मुख्य प्रतिनिधी निवास चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()