कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील शाळांत राबवणार ‘कागल पॅटर्न’

डिजिटल शिक्षण पद्धती; शैक्षणिक गुणवत्ता वाढीला उपयुक्त, विद्यार्थी, शिक्षक, अधिकाऱ्यांचेही मूल्यमापन
digital education
digital educationsakal
Updated on

कोल्‍हापूर : विद्या‍र्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कागल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने डिजिटल पॅटर्न तयार केला होता. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही या डिजिटल शिक्षण पद्धतीने विद्यार्थी गुणवत्ता वाढ होण्यास मदत झाली आहे. या शिक्षण पद्धतीचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्या-त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून पाठांची तयारी करून ती एकाचवेळी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना देऊन, त्यावरील प्रतिसाद नोंदण्याची पद्धत विकसित केली आहे. यात विद्यार्थीच शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन करू लागले आहेत. हाच शिक्षणाचा कागल पॅर्टन ऑफलाईन शिक्षणासाठी जिल्‍हाभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्‍हा परिषदेने नेहमीच शिक्षण क्षेत्रात उठावदार काम केले आहे. तत्‍कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी २० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम राबवून राज्याचे लक्ष वेधून घेतले. यानंतर मात्र जिल्‍हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांकडे फारसे कोणी गांभीयार्न पाहिले नाही. मागील दोन वर्षांत तर कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शाळा व शिक्षकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून मुलांचे शैक्षणिक हित जोपासले. कागल तालुक्याच्या शिक्षण विभागाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांकडून सोप्या भाषेत पाठ तयार करून घेतले. त्या पाठांचा परिणाम मुलांवर कितपत झाला, त्यांच्या ज्ञानात किती भर पडली, याचीहीनोंद घेतली.

कागल पॅटर्नची वैशिषट्ये अशी

  • शाळेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष

  • विद्यार्थी करणार अध्यपनाचे रँकिंग

  • जिल्‍ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग

  • अध्यापनासह संगीत, खेळाबाबत मार्गदर्शन

  • अध्यापनाच्या नवनवीन संकल्‍पनांचा वापर

कोल्‍हापूर जिल्‍ह्याचा शैक्षणिक पॅटर्न राज्यानेही पाहिला असून त्याची अंमलबजावणी केली आहे. मध्यंतरीच्या काळात थोडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षे कोरोनाचे संकट आल्याने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. अशा काळातही कागल तालुक्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अभिनव प्रयोग करून मुलांचे शैक्षणिक हित जोपासले. हा कागल पॅटर्न कमी, अधिक बदल करून जिल्‍ह्यासाठी येत्या १८ तारखेला लागू करणार आहे. त्यांचे चांगले परिणाम येणाऱ्या परीक्षांत दिसतील.

- संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी.

कोरोना काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचा शिक्षण विभाग व तंत्र स्‍नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सहकार्याने ऑनलाईन सॉफ्‍टवेअर तयार केले. अनेक अभिनव प्रयोग राबवल्याने हा पॅटर्न जिल्‍ह्यासाठी राबवला जाणार आहे.

- गणपती कमळकर, गटशिक्षणाधिकारी, कागल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.