कोल्हापूर : तब्बल दोन वर्षानंतर स्थानिक फुटबॉल हंगामाचा महापौर चषकाने श्रीगणेशा झाला. पण, कोरोनामुळे सराव आणि स्पर्धापासून खेळाडू आणि संघ दुरावल्याने खेळाची लय बिघडल्याचे जाणवले. बॉल टच कमी झाल्याने मुख्यतः अनुभवी अव्वल खेळाडूही चाचपडल्याने लौकिकास साजेशी कामगिरी झाली नाही. खेळाडूंच्या हालचाली मंदावण्यासह दमछाक झाल्यानेच मैदानी गोलना लगाम लागला. साहजिकच हुकूमत गाजविणाऱ्या खेळाडूंचा खालावलेला हा खेळ पाहून सर्वच संघ व्यवस्थापक धास्तावले आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे स्थगित झालेल्या महापौर चषक स्पर्धेतील उर्वरित दोन सामने झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक फुटबॉल वर्तुळाला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटले. उपांत्य फेरीत फुलेवाडी क्रीडा मंडळाला हरविलेल्या दिलबहारने अंतिम सामन्यात मातब्बर प्रॅक्ट्रीसला टायब्रेकरमध्ये नमवून हंगामाचा धडाकेबाज प्रारंभ केला. विना प्रेक्षक झालेल्या सामन्यांचे थेट प्रेक्षपणाचा आनंद लुटत चाहत्यांनी संख्येचा विक्रमही नोंदविला.
उपांत्य आणि अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत केवळ एकमेव गोल झाला. खासकरून अनुभवी दिलबहारचा ३७ वर्षीय सचिन पाटीलचा गोलक्षेत्राबाहेरून मारलेला गोल निर्णायक ठरला. मुख्यत्वेः कोरोनापूर्वीच्या हंगामात प्रॅक्ट्रीसने बहारदार कामगिरीव्दारे दबदबा निर्माण केला होता. पंरतु, अंतिम सामन्यात त्यांना अखेरपर्यंत सुर सापडला नाही. तुलनेत दिलबहारने टायब्रेकमध्ये बाजी मारली.
विशेषत - आयलीग, गोवा व्यावसायिक साखळीचा अनुभव असणारे दिग्गज खेळाडू अंतिम सामन्यात होते. पण, प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी खेळाडूंची दमछाक होत होती. स्पर्धांच्या अभावामुळे त्यांचा आत्मविश्वासही डळमळीत झाल्याचे टायब्रेकरमध्ये दिसून आला.
तब्बल पाच तरबेज खेळाडूंनी पेनल्टीची सुवर्णसंधी दवडली. यंदा तर केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूनिशी उतरणार असल्याने संघाची कसोटी आहे. त्यामुळेच अव्वल खेळाडूंची ही अवस्था पाहून इतर संघाचे व्यवस्थापक धास्तावले आहेत.
हे खालावले...
स्टॅमिना
लवचिकता
आत्मविश्वास
समन्वय
अचूकता
स्पर्धा थांबल्याने खेळाडूंनी सरावाकडे दुर्लक्ष केल्याने लवचिकता, स्टॅमिना कमी झाल्याचे दिसले. त्यामुळेच उपांत्य, अंतिम सामना असूनही तीनही संघांचे खेळाडू मूलभूत जबाबदाऱ्या पेलतानाही संघर्ष करताना जाणवले. सरावात सातत्य, अधिक मेहनत आणि सामने यातूनच पूर्वीचा फॉर्म गवसेल.
- विश्वास कांबळे, ज्येष्ठ प्रशिक्षक, कोल्हापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.