कोल्हापूर : मंगळवार पेठ ओलांडून कळंब्याच्या रस्त्याला लागलं, की डाव्या हाताला पद्माळा दिसायला लागायचा. या तळ्यातच कोल्हापूरचा रेसकोर्स होता. छत्रपती राजाराम महाराजांना घोड्यांचा अतिशय शौक. त्यांच्या पागेत अनेक देशी आणि विदेशी जातींचे घोडे होते. महाराजांना घोड्यांच्या रेसचाही छंद होता. या रेसमध्ये महाराजांचेही घोडे भाग घेत. यासाठी वेगळे जातिवंत घोडे त्यांनी बाळगलेले होते. महाराजांचे घोडे रेससाठी पुणे, मुंबई, बंगळूरला जात. महाराजांतर्फेही रेसचे आयोजन केले जाई. अक्कासाहेब महाराज ट्रॉफी या नावाची रेस अजूनही दरवर्षी पुण्याच्या रेसकोर्सवर होते आणि विजेत्या घोड्याच्या मालकाला कोल्हापूरच्या छत्रपतींच्या हस्ते ट्रॉफी दिली जाते.
राजाराम महाराजांनी कोल्हापुरातही रेसचे आयोजन सुरू केले. त्यासाठी पद्माळ्यातले पाणी कमी करून तिथं उत्तम मैदान तयार करवून घेतले. जातिवंत घोड्यांच्या पैदाशीसाठी सोनतळीला "पॅडॉक' सुरू केले. कुठलीही नवी गोष्ट पटकन आत्मसात करणाऱ्या कोल्हापुरात उत्तम जॉकीही तयार व्हायला लागले.
आजकाल कोल्हापुरात फुटबॉल लीगमध्ये खेळायला विदेशी खेळाडू करारबद्ध होतात हे आपल्याला माहीत आहे; पण त्या काळात महाराजांनी काही विदेशी जॉकींना करारबद्ध केलेलं होतं हे आपल्याला नक्कीच माहीत नसेल.
एडगर ब्रिट. मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला हा जॉकी भारतात रेससाठी आलेला होता. एडगर त्या काळचा जगभर नावाजलेला जॉकी होता. महाराजांनी त्याचे कौशल्य हेरले आणि त्याला भरपूर मोबदला देऊन करारबद्ध केले. एडगरaने काही महत्त्वाच्या रेस महाराजांना जिंकून दिल्या.
महाराजांनी त्याची उत्तम बडदास्त ठेवलेली होती. नव्या राजवाड्याच्या परिसरात त्याच्यासाठी खास बंगला होता. शिवाय पुण्या-मुंबईतही त्याच्यासाठी घराची व्यवस्था केलेली होती. एडगरच्या कामगिरीवर खूश होऊन महाराजांनी त्याला नवी कोरी मोटार बक्षीस दिलेली होती.
एडगरला 104 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने लिहिलेल्या आत्मचरित्रात त्याने महाराज कसे वेळोवेळी रेसकोर्सला भेट देऊन जॉकी आणि घोड्यांची चौकशी करत, त्यांची काळजी घेत, याबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. महाराजांच्या उमद्या आणि दिलदार स्वभावाचे एडगरने अतिशय कौतुक केले आहे. एडगरमार्फत महाराज ऑस्ट्रेलियातून कांगारू, इमू आणि इतर वेगवेगळे पक्षी कोल्हापुरात आणवत असत.
तीन वर्षे महाराजांच्या सोबत राहून एडगर ऑस्ट्रेलियाला परतला; पण महाराजांचा त्याच्या मनावर उमटलेला ठसा इतका अमीट होता, की पुढं अनेक वर्षांनी त्याने आत्मचरित्र लिहिल्यावरही त्याच्या मुखपृष्ठावर महाराजांसोबतचा त्याचा फोटो छापलेला आहे.
रेजिनोल्ड स्टोक. मूळचा इंग्लंडचा असणारा हा जॉकीही त्या काळी अतिशय प्रसिद्ध होता. महाराजांनी 1925 च्या सुमारास त्याला करारबद्ध केले. स्टोकने महाराजांसाठी वेस्टर्न इंडिया कपसारखी मानाची शर्यत जिंकली होती. महाराजांचा त्याच्यावर अतिशय जीव होता. महाराजांनी हौसेने त्याचे लग्नही लावून दिलेले होते. अनेकदा शिकार किंवा इतर प्रसंगीही महाराज त्याला सोबत नेत. कोल्हापूरच्या वास्तव्यातच त्याला "राजा' नावाचा मुलगा झाला. 1936 च्या सुमारास स्टोक इंग्लंडला कायमचा परत गेला. त्यानंतर 70 वर्षांनी म्हणजे 2006 मध्ये राजा स्टोकने कोल्हापूरला भेट दिली होती आणि नवीन राजवाड्याच्या संग्रहालयात ठेवलेल्या ट्रॉफीवर त्याच्या वडिलांचे नाव वाचून तो हरखून गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.