हळदी (कोलहापूर) : चाळीस वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव कलिकते यांनी करवीर तालुक्यातील पश्चिम भागाचा विकास व्हावा म्हणून वाशी (ता.करवीर) गावच्या हद्दीत भोगावती सहकारी सूत गिरणीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी येथील जवळपास ४२ एकर जमिनीवर प्रकल्प निश्चित केला आणि १९८१-८२ सालापासून शेतकऱ्यांनी नाममात्र किंमत व घरातील एका व्यक्तीला नोकरी अशा आश्वासनावर जमिनी दिल्या.पण गेल्या चाळीस वर्षात या जमिनीवरती कोणताही प्रकल्प सुरू झाला नसून सर्व शेतकरी व सभासदांची फसवणूक झाली असून एक तर संबंधित प्रकल्प सुरु करा नाहीतर आमच्या जमिनी परत करा असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. वाशी (ता.करवीर) येथे पत्रकार परिषद घेवून प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली.
सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, १९८६ साली "भोगावती सहकारी सूत गिरणी वाशी" या नावाने प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला.पण हा प्रकल्प गुंडाळला आणि १९९२ साली "भोगावती सहकारी रसायन व खत उद्योग वाशी" या नावाने नवीन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. पण संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे गेल्या कित्येक वर्षात यापैकी एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
सदर प्रकल्पासाठी गावातील जवळ ४२ एकर जमीनी नाममात्र किमतीत विकल्या तसेच जमीन विक्रीतून आलेले पैसे देखील शेअर्स स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी गुंतवले.त्यावेळी तत्कालीन राज्यकर्त्यांनी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरीचा शब्द देखील दिला होता.पण इतक्या वर्षात कोणताच प्रकल्प सुरु न झाल्याने सर्व शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.याबाबत वारंवार माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्याकडे दाद मागितली असता कोणताही ठोस पर्याय उपलब्ध झाला नाही.परिणामी प्रकल्प सुरू करा अन्यथा नाममात्र किमतीत घेतलेल्या आमच्या जमिनी परत करा अशी मागणी करत असून याबाबत प्रशासनाला देखील निवेदने देण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास सर्व शेतकरी एकत्र येवून प्रांताधिकारी,तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेस प्रकल्पग्रस्त शेतकरी,शेअर्स घेतलेले सभासद उपस्थित होते.
सदर प्रकल्प सुरू करण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.आतापर्यंत राष्ट्रीय सहकार निगम कडून अर्थसहाय्य मिळण्यास झालेला विलंब आणि आम्ही बराच काळ सत्तेच्या विरोधी बाजूला असल्याने हा प्रकल्प रखडला आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या उद्देशासाठी घेतल्या आहेत तो उद्देश सफल करण्याची आमची मनोधारणा असून सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत.
संपतराव पवार - पाटील,अध्यक्ष,भोगावती सहकारी रसायन व खत उद्योग वाशी
संपादन- अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.