The future of many on the reservation draw; Municipal election reservation will change
The future of many on the reservation draw; Municipal election reservation will change

आरक्षण सोडतीवर अनेकांचे भवितव्य ; महापालिका निवडणुकीचे आरक्षण बदलणार

Published on

कोल्हापूर  : महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांना आता वेध लागले  आहेत ते आरक्षण सोडतीचे, प्रभागात नेमके कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण पडते, यावर अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. 
मार्चमध्ये निवडणूक होईल, असे संकेत आहेत. सभागृहाची मुदत संपण्यासाठी केवळ 19 दिवस बाकी आहेत. शहरातील कोरोनाचा भार हलका झाला आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या कामाला गती येणार आहे. मनपा प्रशासनाने मागासवर्गींसाठी असलेले प्रभाग तसेच लोकसंख्येची टक्केवारी आणि संभाव्य बदल यासंबंधी राज्य निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. 81 पैकी निम्मे प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. यात खुला गट, मागासवर्गीय तसेच ओबीसी प्रभागांचा समावेश आहे. उर्वरीत 40 प्रभागासाठी अशाच प्रकारे वर्गवारी आहे. सध्या जे प्रभाग खुले आहेत, त्यावर ओबीसीचे आरक्षण पडणार आहे. विद्यमान नगरसेवकांना लगतच्या प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे. जे मराठा आहेत, त्यांनी आतापासून कुणबीचे दाखले काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभागावर ओबीसीचे आरक्षण पडल्यानंतर उमेदवारांची संख्या कमी होते. विद्यमान मंडळीचा प्रयत्न कुणबी दाखला काढण्यावर अधिक असणार आहे. सध्या ज्या प्रभागावर अनुसुचित जातीचे आरक्षण आहे, त्याचा विचार करता हे प्रभाग पूर्वीप्रमाणे तसेच राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे अनुसुचित जातीचे आरक्षण पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या जे प्रभाग खुले आहेत, त्यांची चिठ्ठी काढतानाच ते ओबीसी प्रवर्गात टाकले जातील. एखाद्याचे नशीब असेल तरच महिला प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित होऊ शकेल अन्यथा ओबीसी पुरूष अथवा महिला हे आरक्षण निश्‍चित असणार आहे. रोटेशन पद्धतीने आरक्षणाची सोडत निघेल जे प्रभाग पूर्वी ज्या प्रभागासाठी आरक्षित होते ते आता राहणार नाहीत. आजी माजी नगरसेवक तसेच नव्याने निवडणूक लढविणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे समीकरणे मांडावी लागणार आहेत. 
कोल्हापूर उत्तरमध्ये सुमारे 54 प्रभागांचा तर कोल्हापूर दक्षिण 27 प्रभागांचा समावेश होता. कसबा बावड्यातील सहाही प्रभागावर पालकमंत्री सतेज पाटील यांची कमांड आहे. कदमवाडी, ते महाडिक विहीर अशा पाच ते सहा प्रभागात महाडिक गटाची पकड आहे. शहराच्या मध्यवस्तीत तसेच पेठात महाविकास आघाडीचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे राहतील. त्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजप ताराराणी आघाडीला होऊ नये हा उद्देश असेल. 

विधान परिषदेची गणिते 
कोल्हापूर दक्षिणची सत्ता पाटील घराण्याकडे असली तरी या मतदारसंघातील प्रभागात पक्षाऐवजी पाटील विरूद्ध महाडिक असा सामना रंगेल. पुढील विधान परिषदेची गणिते मनपा निवडणुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे दोन्ही गट ताकदीने निवडणुकीत उतरणार हे निश्‍चित आहेत. दरम्यान आरक्षण सोडतीतूनच परस्परांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न होणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.