गडहिंग्लज : नगरपालिकेचा आखाडा निवडणूक लढविणाऱ्या मल्लांसाठी निश्चित झाला आहे. आता प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यात कोणकोणत्या मल्लांचा शड्डू घुमणार हे लवकरच कळेल; परंतु प्रभागांतील मातीच मल्लांची निकाली कुस्ती ठरवणार आहे. आखाड्यात उतरण्यासाठी अंगाला तेल लावून इच्छुक मल्लांनी तयारी सुरू केली असली तरी कोणत्या प्रभागाच्या मैदानात उतरायचे हे आता प्रभागाची हद्दच ठरविणार आहे.
प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १० मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरच प्रभागाची हद्द स्पष्ट होणार आहे. हद्दवाढीमुळे प्रभागांची मोडतोड होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे कोणता भाग, कुठल्या प्रभागात गेला आहे हे पाहण्याची इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संभाव्य प्रभाग अडचणीचा आहे की, उपयुक्त ठरणार, याकडे इच्छुकांचे डोळे लागलेले आहेत. प्रभाग जाहीर झाल्यानंतरच त्याची रचना कळणार असल्याने तोपर्यंत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यादृष्टीने आता राजकीय हालचालींचा गती येणार आहे. विविध राजकीय पक्ष, गट-तट निवडणुकीसाठी सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
पालिकेत सध्या जनता दल सत्तेवर आहे. विरोधी राष्ट्रवादीने गेल्या वर्षभरापासूनच विविध माध्यमातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या कारणाने सत्तारूढांवर आरोपाचे सत्रही सुरू ठेवले आहे. एकंदरीत राष्ट्रवादी आक्रमक झाली असताना सत्तारूढ जनता दलातून शांततेचे वातावरण दिसत होते; परंतु नुकतीच या पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेत एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
शहरातील हे दोन प्रमुख पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाल्याने हालचाली गतिमान होणार आहेत. महाविकास आघाडीच्या तयारीचेही संकेत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मुळात शहरातील शिवसेनेत दोन गट असून महाविकासमध्ये दोन्ही गट जाणार की नाहीत, याबाबत अद्याप तरी संभ्रम आहे; मात्र केडीसीसी बँक निवडणुकीनंतर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. भाजपनेही स्वबळाचाच नारा दिला आहे. तसे झाल्यास चौरंगी निवडणुकीची शक्यता नाकारता येणार नाही. महाविकास आघाडी झाल्यास सध्या तरी तिरंगी लढतीची चिन्हेदिसत आहेत.
नगरपालिकेतील बलाबल
जनता दल : १३ (लोकनियुक्त नगराध्यक्षसह)
राष्ट्रवादी : ६
शिवसेना : १
आगामी निवडणुकीत ११ प्रभागांतून २२ नगरसेवक निवडणार
गोडसाखर निवडणुकीचे पडसाद
दरम्यान, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सभागृहाची मुदत गतवर्षीच संपली आहे. कोरोनामुळे सध्याच्या संचालकांना मुदतवाढ आहे. मार्च महिन्यात आधी कारखान्याची, तर मे महिन्यात पालिका निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास गोडसाखर निवडणूक राजकारणाचे पडसाद पालिकेच्या निवडणुकीत उमटणार आहेत. यंदाच्या हंगामात गोडसाखर कारखान्याच्या राजकारणाचाही बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र असून, तालुक्यात आगामी काळातील राजकीय फेरमांडणीचा मुद्दा उत्सुकतेचा ठरला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.