गडहिंग्लज : ‘गोडसाखर’च्या सभेत गदारोळ

कारखाना चालविण्यास देण्याचा ठराव मंजूर
गोडसाखर’च्या सभेत गदारोळ
गोडसाखर’च्या सभेत गदारोळsakal
Updated on

गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ उडाला. सुरळीत चाललेल्या सभेचा माजी उपाध्यक्षांच्या भाषणाला निवृत्त कामगारांनी विरोध केल्याने नूरच पालटला. याच गोंधळात मांडलेला कारखाना भाडेतत्त्‍वावर चालविण्यास देण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, ठरावाच्या विरोधात असणाऱ्यांनी सभा तहकूबीची मागणी केली आहे. प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय उपनिबंधक अरुण काकडे अध्यक्षस्थानी होते.

सभेची नोटीस जाहीर झाल्यापासूनच राजकीय पक्ष-गट, कामगारांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामुळे सकाळी अकरापासूनच सभासद सभास्थळी येत होते. ठरावाच्या बाजूने असणारे मंजूरच्या टोप्या घालून होते तर विरोधात असणाऱ्यांच्या हातात नामंजूरचे फलक होते. सभेच्या सुरुवात होण्यापूर्वीच माजी संचालकांना केलेल्या स्वतंत्र बैठक व्यवस्थेवरुन वादाची ठिणगी पडली. पण, निवृत्त कामगारांनी केलेला तीव्र विरोधाचा तिढा श्री. काकडे यांनी सामोपचाराने सोडविला. प्राधिकृत मंडळाचे सदस्य किरण पाटील यांनी स्वागत केले. सदस्य अमर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. श्री. काकडे यांनी कारखाना चालविण्यास देणे का गरजेचे आहे याची मुद्देसुद मांडणी केली. पुढील गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी याबाबत निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखाना चालविण्यास देण्याची आणि निवडणूक प्रक्रियेचीही माहिती दिली. करारापूर्वी एक महिना संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी कामगारांची देणी मिळाली पाहिजेत अशी भूमिका मांडली. ''स्वाभिमानी''चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी कारखाना सहकारातच चालविण्यास देण्यासह करार करतानाही अशाच पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली. माजी संचालक सतीश पाटील यांनी चांगल्या कंपनीला कारखाना चालविण्यास देण्याचे मत व्यक्त केले. माजी संचालक अमर चव्हाण यांनी निवडणुकीनंतरच याबाबत विचार व्हावा, अशी आग्रही भूमिका घेतली. संग्राम नलवडे यांनी विरोधामुळे भाषण केले नाही. दरम्यान, प्रकाश चव्हाण यांना बोलण्यास निवृत्त कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला. श्री. चव्हाण व श्री. खोत यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. श्री. काकडे यांनी ठराव मांडल्यानंतर मंजूरच्या घोषणा दिल्या. विरोधकांनी नामंजूरच्या घोषणा दिल्या. गोंधळातच राष्ट्रगीत संपविले. ठरावाच्या विरोधात असणाऱ्यांनी ठराव चुकीच्या पद्धतीने मांडल्याने सभा तहकूब करण्याची मागणी श्री. काकडे यांच्याकडे केली.

प्राधिकृत मंडळाला रोखण्याचा प्रयत्न

सभास्थळावरुन जाणाऱ्या प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे, अमर शिंदे, किरण पाटील यांना अॅड. श्रीपतराव शिंदे, संग्राम नलवडे, अमर चव्हाण, बाळेश नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी रोखले. मंजूर म्हणणारे सभासद नव्हते, सभेबाबत लेखी द्या आदी प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिस प्राधिकृत मंडळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते; पण त्याला दाद न देता रोखून धरले. श्री. काकडे व श्री. शिंदे कार्यस्थळापासून बाहेर आले. श्री. पाटील अडकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.