कोल्हापूर : शहरातील विविध भागांत कुंडांत विसर्जित केलेल्या घरगुती गणेशमूर्ती इराणी खणीत वेळेत व सुलभ पद्धतीने विसर्जित करण्यासाठी महापालिकेने यंदा प्रथमच आधुनिक स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला. या यंत्रणेद्वारा शिस्तबद्धपणे १९ हजारांवर मूर्तींचे विसर्जन झाले.
तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून मूर्तींचे पुनविसर्जन योग्य पद्धतीने, वेळेत आणि सुलभ करण्यासाठी आधुनिक पद्धतीची स्वयंचलित यंत्रणा साकारण्याचे ठरवले होते. यासाठी आमदार पाटील यांनी गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतून ८३ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून हा टेलिस्कोपिक कन्व्हेअर बेल्ट साकारला. महापालिकेने फाउंडेशन व इतर कामांसाठी सात लाखांचा निधी खर्च केला.
यंत्रणा सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पहाटे साडेचारपर्यंत कार्यान्वित होती. एकावेळी चार-चार वाहने उभी करून त्यातील हजारो मूर्ती यंत्रणेद्वारा विसर्जित केल्या जात होत्या. अनेक वेळा त्या यंत्रणेवर पाठोपाठ मूर्ती ठेवताना तेथील कर्मचाऱ्यांचीच दमछाक होत होती. मूर्ती योग्य पद्धतीने विसर्जित केल्याचे समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर होते. या संकल्पनेला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हातभार लागला. पर्यावरणपूरक चळवळीला बळ मिळाले आहे.
यंत्रणा ठेवणार यंत्रशाळेत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या छोट्या मूर्ती खणीवरील यंत्रणेवरून विसर्जित केल्या जाऊ शकतात. ही यंत्रणा काढून ठेवता येण्यासारखी असल्याने अनंत चतुर्दशीनंतर ती सुरक्षित ठेवण्यासाठी खणीवरून काढून महापालिकेच्या यंत्रशाळेत ठेवली जाणार आहे. तिथे त्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. पुढील गणेशोत्सवापूर्वी ती जागेवर बसवून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
इराणी खणीत ५५ हजारांवर गणेशमूर्ती
इराणी खाणीत ५५३४४ मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. गेल्यावर्षीपेक्षा दोन हजार मूर्तींची यंदा वाढ झाली. गांधी मैदान विभागीय कार्यालय क्षेत्रातून ११२३१, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय १०३३५, राजारामपुरी विभागीय कार्यालय ९४४०, ताराराणी विभागीय कार्यालय ७६४० मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. शिवाय शहर तसेच ग्रामीणमधील १६ हजार ६९८ मूर्ती थेट खाणीत आल्या. काहींनी घरीच बादलीत विसर्जीत केल्या. जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ४४९ मूर्ती विसर्जित केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.