कोल्हापूर - गणेशमूर्तींसाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा, असा प्रशासनाचा आदेश असतानाही बाजारपेठेत रासायनिक रंगांचा वापर केलेल्या मूर्ती दिसत आहेत. केवळ आकर्षक मूर्ती या एकाच आग्रहाखातर असे प्रकार वाढत असून, त्यावर कधी प्रतिबंध येणार, असा सवाल आता पर्यावरणप्रेमी व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
सध्या शहरात विविध ठिकाणी मूर्तींचे स्टॉल सजले असून, अशा स्टॉल्सची तपासणी केली, तर हा प्रकार प्रशासनाच्या नजरेत तत्काळ येईल, अशी मागणीही आता होत आहे. गणेशमूर्ती ही पर्यावरणपूरक रंगांनीच रंगवण्याबाबतच्या सूचना प्रशासनाकडून प्रत्येकवर्षी मूर्तीकारांना दिल्या जातात.
काही मूर्तीकार त्याची काटेकोर अंमलबजावणी करतात. मात्र, काही मूर्तीकारांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. शहर आणि जिल्ह्यातील मूर्तीकार जरी सोडले तरी अलिकडच्या काळात बाहेरगावाहून शहरात मूर्ती विक्रीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. या मूर्तींसाठीही रासायनिक रंगांचाच वापर केल्याचे प्रकर्षाने जाणवते.
त्यामुळे केंद्रीय प्रदूषण निमंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचीही पायमल्ली होत आहे. याबाबत प्रशासन आता तरी जागे होणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
येथील मूर्तीकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींबरोबर राज्यातील इतर ठिकाणांहून आणलेल्या तयार गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल सर्वत्र लागले आहेत. या ठिकाणीही रासायनिक रंगांचा वापर झाल्याचे जाणवते. मात्र, याबाबत कुठलीही कारवाई अद्यापही झालेली नाही.
सध्या वापरल्या जाणाऱ्या बहुतांश रंगांमध्ये रासायनिक घटक आहेत. या रंगांना पर्यायी रंग उपलब्ध असतानाही त्याचा वापर होत नाही. केवळ घरगुतीच नव्हे, तर सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीसाठीही रासायनिक रंग वापरला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर आदर्श असल्याचे प्रशासन अभिमानाने सांगते. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. ती व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.
प्रशांत मंडलिक, पर्यावरणप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.