हळदी (कोल्हापूर) : आजी-माजी आमदारांचं गाव असणाऱ्या सडोली खालसा (ता. करवीर) येथील निवडणूक जिल्ह्याचं लक्ष वेधणारी ठरते. आतापर्यंत काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू आघाडी आणि शेकापप्रणीत शेतकरी आघाडी, अशाच लढती झाल्या असल्या तरी यावर्षी मात्र येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे. ही लढत तिरंगी होण्याला गेल्यावर्षीच्या विधानसभेतील काही संदर्भ कारणीभूत असण्याबरोबरच सद्यस्थितीला स्वतःची ताकद आजमावण्याच्या दृष्टीने दोन प्रमुख नेत्यांसह तिसऱ्या आघाडीची भूमिका सध्यातरी चर्चेत आहे.
२००९ पर्यंत शेकापप्रणीत शेतकरी आघाडीचं ग्रामपंचायतीवर वर्चस्व राहिलं आहे. २००९ मध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत बिनविरोध केली; पण २०१५ मध्ये पुन्हा निवडणूक लागली आणि २५ वर्षांनी काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू आघाडीची सत्ता आली. माजी आमदारांचे पुतणे व विद्यमान आमदारांचा भाचा असणारे स्वरूपसिंह पवार-पाटील यांच्या तिसऱ्या आघाडीची चर्चा गावात सुरू आहे.
ज्येष्ठांसह अनेकांची विकासकामाच्या बाबतीत गावचं नाव आघाडीवर ठेवणारे व गावात निधी आणणारे उमेदवार प्रत्येक गटाने देऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी अपेक्षा आहे, तर काहींकडून वेगळ्या पर्यायाची चाचपणीही सुरू आहे. अशावेळी प्रस्थापितांबद्दल काही अंशी असलेली नाराजी, गोकुळमधील जागा भरती आणि इच्छुकांची संधी नाकारणे, या गोष्टी कळीचा मुद्दा ठरू शकतात. यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा नक्कीच पणाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर तीन आघाड्या झाल्या, तर सद्यस्थितीला राजर्षी शाहू आघाडीकडून गोकुळचे विद्यमान संचालक उदय पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, शेतकरी आघाडीकडून समरसिंह पवार-पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील, तर तिसऱ्या आघाडीकडून स्वरूपसिंह पवार-पाटील हे युवा नेते निवडणुकीची धुरा खांद्यावरती घेऊन एकमेकांविरुद्ध लढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - धनुष्यबाण देणार अपक्षांना बळ ? -
दृष्टिक्षेपात
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.