गेल्या चार दिवसांपासून गजापूर, विशाळगड भागातील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. संचारबंदीसदृश स्थिती आहे. बाहेर गावाचे लोक गावात येत नाहीत. गावातील लोक बाहेर जाऊ शकत नाहीत.
कोल्हापूर : विशाळगड येथील (Vishalgad Riots) अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी गजापूरमधील घरांचे व प्रार्थनास्थळांचे नुकसान केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे दिले.
त्यासोबत येथील लोकांना दिलासा देणे, त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांचे जीवन पूर्ववत करण्याला शासन प्राधान्य देईल. त्याला सर्वांनी साथ देणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. मुश्रीफ यांनी गजापूर (ता. शाहूवाडी) ला भेट देऊन मदतीचा आढावा घेतला. दंगलीत नुकसान झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले,‘‘गावात विशाळगडसारखी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याचे नियोजन आहे. न्यायालयाकडून अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशांचा अभ्यास करून पुढील सुनावणीवेळी प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. गावात तातडीची मदत म्हणून प्रत्येकाला ५० हजारांची मदत केली आहे. नुकसानीबाबत पंचनामे करून दोन कोटी ८५ लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केला आहे. ही मदत पीडितांना तातडीने दिली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.’’
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण आदी उपस्थित होते. दंगलीमध्ये नुकसानीची झळ बसलेल्या ग्रामस्थांनी मुश्रीफ यांना माहिती दिली. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. आमची घरे, गाड्या फोडून टाकल्या. घरातील लहान मुले घेऊन आम्ही रहायचे कुठे, रोजगार कसा करायचा, असा प्रश्न आहे. गावातील एका व्यक्तीकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्या विषयी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
दंगलीत घराचे नुकसान झालेल्या प्रणिता पाटील म्हणाल्या,‘‘येथे गेळवडे येथील धरणग्रस्त आहे. आम्हाला भाततळी येथे पुनर्वसनातून जागा दिली. तेथे रोजगार नव्हता म्हणून गजापूर येथे आम्ही रोजगार करीत सासू-सासऱ्यांसह राहतो, मोलमजुरी करतो. आमच्या तीन पिढ्या येथे राहतात.’’ दंगलीत आमच्या घराचे छत पाडले. भरपावसात आम्हाला राहायला जागा नाही. दंगलीवेळी आम्ही भयभीत झालो. मुस्लिम बांधवांनीच आम्हाला येऊन येथे धीर दिला, राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली, असे सांगताना त्यांनाही अश्रू अनावर झाले.
वर्षानुवर्षे विशाळगडावर आम्ही हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतो. आम्ही शिवजयंती, महाशिवरात्री असो वा अन्य कोणताही सण, एकमेकांच्या साथीने साजरा करतो. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. आजवर आमच्यात भेदाची भावना केव्हाच नव्हती. यापुढेही आम्ही एकोप्यानेच राहणार आहोत; मात्र अचानक बाहेरून आलेल्या दंगलखोरांनी आमच्या जगण्यावरच हल्ला केला. हा प्रकार वेदनादायी आहे, असेही येथील महिलांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून गजापूर, विशाळगड भागातील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. संचारबंदीसदृश स्थिती आहे. बाहेर गावाचे लोक गावात येत नाहीत. गावातील लोक बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गजापूरकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवले आहेत. जे लोक मदत देण्यासाठी येतात, त्यांची नावे, गाडी क्रमांक लिहून खात्री झाल्यानंतरच मोजक्या लोकांना गजापूरकडे सोडण्यात येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.