ड्रॅगन फ्लाय ही नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणाचे कार्य करते म्हणून तिचे महत्त्व मोठे आहे.
पावसाळा (Rainy Season) संपत आला की, ‘ड्रॅगन फ्लाय’ (Dragonfly) या उडत्या माश्यांचे थवे गावाच्या शेतीपासून शहरातील गल्ली-बोळापर्यंत उडताना दिसत असत. ते नैसर्गिक कीड नियंत्रणाचा महत्त्वाचा घटक आहेत. अलीकडच्या पाच-सात वर्षांत या माश्यांचा अधिवास धोक्यात आला असून, पैदास कमी होत आहे. त्यामुळे शेतीतील मित्र कीड नियंत्रणाला मर्यादा येत आहेत. अलीकडच्या काळात कमी झालेले पाऊसमान, कोरडे झालेले पाण्याचे झरे, पाणथळाच्या जागा याचा फटका ड्रॅगन फ्लायला बसत आहे.
एक ते दीड इंच आकाराची ही ‘ड्रॅगन फ्लाय’ माशी सतत भुर्रभूर आवाज करत हवेतील भक्ष्यावर अचानकपणे झडप घालते. अशा माश्या समूहाने आढळत होत्या. शाळकरी मुलं अशा माश्या पकडण्यासाठी धावत असत. अनेक जण बालपणी या माशीला शेंबडी माशी किंवा हेलिकॉप्टर (Helicopter) असेही संबोधत असत. ही माशी पिकांवरील कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्धांत संशोधनातून मांडले आहेत. ते संशोधन फारसे सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचलेले नाही.
परिणामी, शेती पिकांवरील कीड नियंत्रण करणारी ही माशी सर्वच पातळ्यांवर विस्मृतीत गेली. तिचे जगणेच धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत पूर्वीप्रमाणे ड्रॅगन फ्लायचे थवे दिसेनासे झाले आहेत. ड्रॅगन फ्लायची संख्या घटल्यामुळे शेती पिकांवरील कीड वाढीला बळ मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या ड्रॅगन फ्लाय माशींचे संवर्धन झाले पाहिजे, हा मुद्दा चर्चेत आलेला नाही. त्यामुळे पिकांवरील किडीचा धोका आणखी वाढत आहे.
पश्चिम घाटात ड्रॅगन फ्लाय माश्यांच्या ४५ प्रकारच्या प्रजाती आहेत. पावसाळ्यात जेथे पाणी साठते तेथे माश्या अंडी घालतात. त्यातून अळ्या तयार होतात. या अळ्यांचे रूपांतर ड्रॅगन फ्लाय माशीमध्ये होते. पंखात जसे बळ येते तशा या माश्या हवेत उडू लागतात. वाऱ्याच्या झोतासोबत येणाऱ्या पिकांसाठी धोकादायक असलेल्या किडी खाऊन ड्रॅगन फ्लाय जगते. त्यामुळे पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढत नाही. विशेषतः मावा या रोगाच्या किडी ड्रॅगन फ्लाय संपवतो. तेव्हा पिकांचे रक्षण होते. या माश्या अळी रूपात असताना त्या पाण्यातील डासांची पिल्ले खातात. परिणामी डासांची पैदास कमी होण्यास मदत होते. ड्रॅगन फ्लायची संख्याच कमी झाल्याने शेती पिकावरील किडी व डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे चित्र आहे.
पूर्वी ड्रॅगन फ्लाय माशीचे थवे येत होते. अजूनही येतात. मात्र, त्यांची संख्या कमी झाल्याचे दिसते. ज्या काळात ड्रॅगन फ्लाय माश्या जास्त प्रमाणात दिसत होत्या, त्या काळात मावा रोगाचा प्रादुर्भाव कमी आढळत होता, हेही अनुभवले आहे
-धोंडीराम डवरी, शेतकरी, शिरोळ.
ड्रॅगन फ्लाय ही नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणाचे कार्य करते म्हणून तिचे महत्त्व मोठे आहे. अलीकडच्या काळात पाऊसमान कमी झाले आहे. पाण्याचे झरे, पाणथळाच्या जागा कोरड्या झाल्या तसा ड्रॅगन फ्लायचा अधिवास धोक्यात आला. परिणामी, ड्रॅगन फ्लायच्या अळ्या तयार होण्यावर मर्यादा आल्या. ड्रॅगन फ्लाय हा अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या संवर्धनासाठी पाणवठ्यांचे प्रदूषण रोखले पाहिजे. रासायनिक खतांचा वापर वाढल्याने ड्रॅगन फ्लाय ज्या किडींना खातो त्या किडी कमी झाल्या, ड्रॅगन फ्लायचे भक्ष्यही संपून गेले, असेही दिसते.
-डॉ. एस. एम. गायकवाड, शिवाजी विद्यापीठ, जीवशास्त्र संशोधक.
मुलांना हल्ली ड्रॅगन फ्लाय माशी क्वचित पाहायला मिळते. त्यामुळे त्या माशीविषयी पूर्वीसारखे मुलांमध्ये कुतूहल राहिलेले नाही. वास्तविक मुलांना फुलपाखरू आवडतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व मुले जाणून घेतात. त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्लाय जास्त प्रमाणात दिसू लागल्यास मुलांमध्ये या माशीविषयी कुतूहल निर्माण होईल. त्या माशीचे नैसर्गिक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे ती जाणून घेतील.
-विशाल असादे, शिक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.