आशिया खंडातला सर्वात मोठा हा शेतकरी संघ असून, त्यावर लोकांचा विश्वास आहे.
कोल्हापूर : ‘पालकमंत्री दीपक केसरकर शिंदे गटाचे. खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर हेदेखील शिंदे गटाचे. शेतकरी सहकारी संघाचे प्रशासकीय अधिकारी शिंदे गटाचे असताना जिल्हाधिकाऱ्यांचे संघाच्या भवानी मंडपातील इमारतीच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचे धाडस होतेच कसे,’ असा प्रश्न वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे उपस्थित केला.
शेतकरी सहकारी संघाचे (Shetkari Sangh) दिवंगत कार्यकारी संचालक बाबा नेसरीकर यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम झाला. मुश्रीफ म्हणाले, ‘शिंदे गटाचे पालकमंत्री, आमदार, खासदार असताना हा प्रकार घडल्याने मला आश्चर्य वाटले. ‘बिच मे तेरा का क्या काम,’ असे कोणी म्हणायला नको म्हणून मी लक्ष घातले नाही. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अंमलात आणून जागा ताब्यात घेतली.
दसऱ्यानंतर मात्र संघाची जागा ताब्यात घेण्याचा अट्टहास कशासाठी, याची विचारणा केली जाईल. जिल्हाधिकारी (Rahul Rekhawar) व देवस्थानने दसऱ्यानंतर बैठक घेऊन त्या जागेचा उपयोग कसा होणार पटवून द्यावे. यानिमित्ताने मॅग्नेट कंपनी करारावर दिलेल्या जागेतून बाहेर पडणार असेल तर जिल्हाधिकारी यांचे कौतुक करेन.’
मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘नेसरीकर हजारो एकर जमिनीचे मालक होते. विश्वासार्हता कशी कमावता येते, हे त्यांनी दाखवून दिले. ते निगर्वी, निष्कलंक व चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी ठरवले असते तर ते गडहिंग्लजचे आमदार झाले असते.’
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘संघाशी चर्चा न करता जागा ताब्यात घेण्याचे कृत्य जिल्हाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर झालेल्या आंदोलनात सामान्य माणूस सहभागी झाला. आशिया खंडातला सर्वात मोठा हा शेतकरी संघ असून, त्यावर लोकांचा विश्वास आहे. नेसरीकरांच्या दृढ निष्ठेतून तो विश्वास अढळ झाला आहे.’
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘नेसरीकर यांचे सहकार चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्यासारख्या लोकांची सहकार चळवळीत आवश्यकता आहे. ’अशासकीय प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी संघाला मिश्र खताचा परवाना मिळावा, पार्वती चित्रपटगृहाजवळील पेट्रोल पंप परत मिळावा, एमआयडीसीतील संघाच्या जागेवर शासनाचा डोळा असल्याने त्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, अशा मागण्या केल्या.
याप्रसंगी वसंतराव मोहिते, यशोधन शिंदे, जयवंत पाटील, अजितसिंह मोहिते, सचिन सरनोबत, अॅड. अशोक साळोखे, धनाजी सरनोबत, चंद्रकांत यादव, अनिल घाटगे उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.
‘संघाच्या आगामी निवडणुकीत प्रामाणिक लोकांना स्थान कसे देता येईल आणि निवडणूक बिनविरोध कशी होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. संघाला मिश्र खताचा परवाना देण्याचा प्रश्न पुढच्या आठवड्यात मार्गी लावला जाईल. संघाच्या एमआयडीसीतील जागेवर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळायला काय अडचण आहे? ते शिंदे तर गटाचे आहेत’, अशी टिप्पणी मुश्रीफ यांनी केली.
देसाई यांनी केलेल्या मागण्या व निवडणुकीचा संदर्भ घेत आबिटकर म्हणाले, ‘मुश्रीफ यांचा अजून किती कार्यकाळ आहे, माहीत नाही. त्यामुळे त्यांनी २०-२० मॅचप्रमाणे संघाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.