कोल्हापूर : सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली. कोरोनासाठीचा हा ‘हाय अलर्ट’ असल्याचे प्रशासकीय पातळीवर सांगण्यात येत आहे. दररोज आणि आठवड्याला वाढणाऱ्या बाधितांची संख्याही मोठी असण्याची शक्यता आहे. सर्व रुग्णांसाठी बेड व्यवस्था, औषधोपचार, ऑक्सिजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा हा कहर १५ सप्टेंबरनंतर कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्फोट होईल, असे वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसांपूर्वीच केले होते. तसेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कंबर कसली आहे. मागील दोन दिवसांत आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांच्यासोबत बैठका घेऊन सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कोरोना विस्फोटाचा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्यात ते
व्यग्र आहेत.
जिल्ह्यात मार्चमध्ये कोरोनाने प्रवेश केला. आज जवळपास पाच महिने झाले आहेत. या कालावधीत दररोजच कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मार्च ते जून दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या कमी होती; मात्र संपूर्ण जुलैपासून आजअखेर उच्चांकी रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या कमी होण्याची कोणतीही शक्यता नसतानाच येणाऱ्या सप्टेंबरमध्ये म्हणजेच आणखी १२ ते १५ दिवसांनी या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होणार असल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात आज घडीस
दररोज कोरोनाचे ५०० ते ७०० रुग्ण सापडत आहेत. ही संख्या सप्टेंबरमध्ये दुप्पटीहून अधिक होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात दिवसाला ११०० तर १० दिवसात ११ हजार रुग्ण सापडतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही संख्या दिवसा दोन हजार रुग्ण तर १० दिवसात उच्चांकी २० हजार रुग्ण होतील, असे गृहित धरुन उपाययोजनांना सुरुवात केली आहे. नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांपैकी दोन टक्के लोकांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सीजनची गरज ध्यानात घेवून नियोजन करण्यात येत आहेत. व्हेंटिलेटर खरेदीसह हाय फ्लो नसल कॅनोला व एनआयव्ही या मशीनची उपलब्धताही केली जात आहे.
दोन टक्के लोकांनाच व्हेंटिलेटरची गरज
कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ८० ते ९० टक्के रुग्ण किरकोळ औषधोपचार व घरातीलच उपचाराने बरे होतात. तर दहा टक्के रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. यातील आठ टक्के रुग्णांना ऑक्सीजन व इतर उपचारांनी बरे करण्यात येते. दोन टक्के रुग्णांनाच व्हेंटिलेटरची गरज भासते. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकालाच व्हेंटिलेटरची गरज भासत नाही. त्यामुळे कोरोनाच्या कोणत्याही रुग्णाने घाबरुन जाण्याचे कारण नाही.
सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात येणारी रुग्णसंख्या गृहीत धरून त्यांच्यासाठी बेड व्यवस्था, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्याच्या सर्व त्या सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही; मात्र लक्षणे असतील तर रुग्णालयात व लक्षणे व आजार नसतील तर घरातच उपचार घेऊन गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून द्यावेत.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
ही घ्या खबरदारी!
कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका
मास्कशिवाय घरातून बाहेर पडू नका
गर्दीत जाणे टाळा
प्रतिकारशक्ती चांगली राहील, याची खबरदारी घ्या
कोरोनाचे लक्षण दिसल्यास चाचणी करा
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.