Holar Society : डफडं खच्चून वाजतं, नाचाची नशा वाढवतं...! होलार समाज बदलतोय अन् परंपराही जपतोय

डफडं हे खच्चून वाजवलं जाणारं वाद्य आणि म्हणूनच नाचाची नशा ते वाढवतं. त्याच्या जोडीला पिपाणी म्हणजेच लहान सनई.
Holar Society
Holar Societysakal
Updated on

कोल्हापूर - डफडं हे खच्चून वाजवलं जाणारं वाद्य आणि म्हणूनच नाचाची नशा ते वाढवतं. त्याच्या जोडीला पिपाणी म्हणजेच लहान सनई. असा हा ‘पीऽऽऽढबाक''चा नाद कानावर पडला की, आपसूकच माणूस नाचायला लागतो. आमच्या होलार समाजानं बदलत्या काळातही हा पारंपरिक व्यवसाय जपला आहे.

शहरात आमचा उंबरा तीनशेचा आणि प्रत्येक घरातील किमान एक जण तरी ही परंपरा नेटाने पुढे नेतो आहे....अर्जुन माने ही परंपरा उलगडत असतात. उद्या (मंगळवार) पासून शहरात त्र्यंबोली यात्रांना प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा संवाद रंगला.

श्री. माने हे होलार समाजाचे अध्यक्ष. ते सांगतात, ‘शहरातील लक्ष्मीपुरीबरोबरच प्रत्येक गावांत होलार समाज आहे. ‘पीऽऽऽ ढबाक’ला तर शाहूकालीन परंपरा आहे. हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मीयांच्या विविध उत्सवांत समाजाला वादनाचा मान मिळाला आहे आणि ही परंपरा आम्ही इमाने-इतबारे जपत आहोत. माझाच विचार केला तर पदवीपर्यंत शिक्षण झाले. मात्र, पारंपरिक वाद्ये आणि कोल्हापुरी फेट्यांचाच व्यवसाय आहे.’

पांगिरे (ता. भुदरगड) येथील सुरेश वाजंत्रे यांचं वय पंचावन्न. ते भरभरून बोलू लागतात. ‘आमच्या आज्जा, पणज्यापासून पारंपरिक वाद्यांची परंपरा आम्ही जपली आहे. जसं कळायला लागलं तसं आम्हालाही हा नाद आपसूकच या व्यवसायाकडे घेऊन आला. हिंदू असो किंवा मुस्‍लिम, प्रत्येक देवासाठी म्हणून विशिष्ट वाद्ये आहेत.

‘पीऽऽऽढबाक', ‘ढौल्या पी पी’बरोबरच बदलत्या काळात आम्ही सनई, चौघडे, ताशा, आदी वाद्यांनाही मागणी असते. ‘गावकी’ची परंपरा अजूनही कायम आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध संस्थांनी आमच्या या वादनाचा विविध पुरस्कारांनी गौरवही केला आहे.’

सूर, डफ आणि सनई...

‘पी’ म्हणजे पिपाणी आणि ढबाक म्हणजे डफड्याचा आवाज. डफड्याचा येणारा ‘डब डब डब’ अशा आवाजावरूनच कोल्हापुरी भाषेत ‘ढबाक’ असा शब्द प्रचलित झाला. पिपाणी म्हणजे लहान सनई किंवा सुंदरी. सनई तशी सर्वांना परिचित असली तरी सुंदरी मात्र आता फारशी ऐकायला मिळत नाही. त्र्यंबोली यात्रेत पूर्वी सूर, डफ आणि सनई अशी तीन वाद्ये असायची. पण, पंचवीस वर्षांपूर्वीपासून ही परंपरा बंद झाली आणि फक्त डफ व सनई ही दोनच वाद्ये पुढे कायम राहिली.

असेही संशोधन....

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील होलार समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती’ या विषयावर संशोधनही झाले आहे. त्यातील आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात १९६१ मध्ये समाजाची लोकसंख्या ८६१, १९९१ मध्ये दोन हजार ५५०, २००१ मध्ये दोन हजार ९३८ तर २०११ मध्ये चार हजार ९८ इतकी होती. सद्य:स्थितीचा विचार केला तर किमान दोन हजार कुटुंबे जिल्ह्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.