शालेय निकाल झाल्यावर बहुतेक सर्वच लहान मुलांना आपल्या मामाच्या गावाला जाण्याची आतुरता, आस लागलेली असायची.
बेडकिहाळ : 'झुक झुक झुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया', विशेष करून मामाच्या गावाच्या परिस्थिती बरोबर सर्वांगीण वर्णन करणारं हे बालगीत सर्वांनाच आठवत असेल.
मार्चमध्ये शालेय परीक्षा (School Examination) झाल्यानंतर एप्रिल 10 तारखेपर्यंत प्राथमिक शाळेतील (Primary School) शालेय निकाल झाल्यावर बहुतेक सर्वच लहान मुलांना आपल्या मामाच्या गावाला जाण्याची आतुरता, आस लागलेली असायची. सर्वच मुले मामाच्या गावाला जायची. मात्र, अलीकडं अभ्यास, शिकवणीत विद्यार्थी व्यस्त असल्याने केवळ आठवणी उरल्या असून सुटीतील मामाचे गाव दूर राहिले आहे.
पूर्वी आजोळी मामा-मामी, आज्जा-आज्जी, मावशी अशी मंडळी या लहान मुलांची आतुरतेनं प्रतीक्षा करत असत. उन्हाळ्यात सर्वजण एकत्रित नदी, विहिरीस आंघोळीला जाणे. आंबे, जांभूळ, चिंचा खाणे, एकत्रित मौज करत. मामाच्या घरात शिकरण पोळीसह विविध पदार्थ करून सर्वजण एकाच पंगतीत आस्वाद घेत. त्यावेळी श्लोक, सुविचार, म्हणी, गीते सादर केली जात. त्यामुळे मुलांच्या लहान मनावर चांगले संस्कार होत.
सायंकाळी अंगणात खेळल्या जाणाऱ्या खेळामुळं आरोग्य तंदुरुस्त राहायचं. शुभं करोति, दीपमंत्र व अंगणात आज्जी वा मामा, मावशी यांच्याकडून नीती कथा ऐकवल्या जात. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून बदलत्या गतिमान संगणकीय काळात सर्वच बदलत आहे. शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेमुळे सुटीतही मुले शिकवणी व विविध प्रशिक्षणात व्यस्त राहिली. त्यामुळे मामाचे गाव केवळ आता आठवणीपुरते उरले आहे.
त्याकाळी मुलांना मामाच्या गावाला जाणे म्हणजे वेगळा आनंद होता. मामाच्या गावातील ती माणसं, सुटीला आलेली मुले यांच्यात एकप्रकारे वेगळे स्नेहपूर्ण ममतेचे व आपुलकीचे वातावरण निर्माण होत. त्याकाळी मामाचे गाव म्हणजे एक संस्कार केंद्र होते; पण बदलत्या मोबाईल व संगणक काळात सर्व काही बदलले आहे.
-बंडाकाका जोशी, ज्येष्ठ नागरिक, नेज
बदलत्या काळात प्राथमिक स्तरापासून शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपला मुलगा गुणवत्तेत असावा ही अपेक्षा असते. त्यामुळे मुलांना सुटीच्या काळातही पुढील अभ्यास व इतर प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागतो. बदलत्या काळाची ही गरज वाटते. यातूनच आपल्या मामा, मामींना एक-दोन दिवस मुले भेटून येतात.
-शरद जाधव, अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन, बेडकिहाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.