लई भाई ! आयटीआय शिकतानाच या 'रॅंचो' ने बनवली नऊ यंत्रे...

ITI student living in a rural area has developed nine types of devices
ITI student living in a rural area has developed nine types of devices
Updated on

मांगूर - ग्रामीण भागात राहून आयटीआय शिकणाऱ्या तरूणाने नऊ प्रकारची यंत्रे बनविली आहेत. त्याच्या या कौशल्यामुळे तो ग्रामीण भागातील प्रयोगशील तरूण व लोकांसाठी 'थ्री इडियट्‌स' चित्रपटातील 'रॅंचो' ठरला आहे. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी कोळपणी यंत्रापासून ते महिलांच्या सुरक्षेसाठीचे विशेष यंत्र त्याने बनविले आहे. यातील अनेक यंत्रे टाकाऊ वस्तूंपासून बनविली आहेत. सौरभ संजय खोत (वय18, रा. शिवापूरवाडी, ता. निपाणी) असे त्याचे नाव आहे.

शिवापूरवाडीसारख्या छोट्याशा वाडीवर पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील सौरभने कमीत कमी खर्चामध्ये ही सर्व यंत्रे तयार केली आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सौरभ खोत हा युवक सध्या निपाणीतील मराठा मंडळ आयटीआय येथे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. आई व वडील हे शेती करतात. घरची परिस्थिती बेताचीच असताना पेंटीग, गाड्यांची दुरुस्ती अशी पार्टटाईमची कामे करून तो सध्या शिक्षण घेत आहे.
सध्या तीन महिन्यांपासून देशभर लॉकडाऊनचा काळ असल्याने या काळाचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. याकामी तो शिकत असलेल्या संस्थेचे चेअरमन राजेश कदम, मराठा मंडळ आयटीआय निपाणीचे सर्व शिक्षक, प्रदीप खोत, मित्र परिवार व आई वडील याचे मार्गदर्शन लाभले.

खत पेरणी यंत्र

300 रुपये खर्चातून खत पेरणी यंत्र बनविले. यामध्ये 20 लिटर बॉटल, हॉल, पाईप इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. यातून विविध प्रकारच्या पेरणीबरोबर लागवडीसाठी उपयोग होत आहे. दोन एकरहून अधिक एकरांवर त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.

सुरक्षा यंत्र

800 रुपये खर्चातून मानवी सुरक्षा यंत्र (ह्युमन सेफ्टी डिव्हाइस) हे मशीन बनविले. यामध्ये 3.7 होल्टची बॅटरी व कॉईलचा वापर केला आहे. यामुळे अचानकपणे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्यापासून संरक्षण करण्यासाठी उपयोग होतो.

14 फुटी दुचाकी

30 हजार रुपये खर्चातून लांबलचक दुचाकी (चौदा फुटी) गाडी बनविली. यासाठी जुनी बंद पडलेली गाडी, चिनवेल, बसवून पॉवर टेलर बसवून गाडी तयार केली. या गाडीचे मायलेज प्रति लीटर 50 किलोमीटर असे आहे.

तण काढणारे मशीन

200 रुपये खर्चातून बॅटरीवर चालणारे तण काढणारे मशीन बनविले. यामध्ये जुन्या बंद पडलेल्या औषध पंपातील बॅटरी व मोटारीची उपयोग केला आहे. त्याचा फायदा शेतीतील तण काढण्यासाठी होत आहे.

पीक रक्षणासाठी

300 रुपये खर्चातून चिमणी हाकणारे (पाखरांपासून पिकांच्या रक्षणासाठी यंत्र) तयार केले. यामध्ये मोटार व ताट यांचा उपयोग करण्यात आला आहे. एक एकर शाळू पिकात याचे प्रात्यक्षिक केल्यानंतर शेतामध्ये एकही पाखरू पिकात आले नाही.

सॅनिटायझर मशीन

कोरोनापासून गावचे संरक्षण करण्यासाठी केवळ 450 रूपये खर्चातून सॅनिटायझर मशिन बनवले. यामध्ये 50 लिटरचा बॅरेल, जुन्या औषध पंपातील मोटार, नोझर यांचा उपयोग करून त्याची निर्मिती केली आहे.

गॅस निर्मिती मशीन

केवळ 50 रुपये खर्चातून गॅस तयार करण्याचे मशिन बनविले आहे. यासाठी दोन पाण्याच्या बॉटल व पेट्रोलचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल व पाण्यापासून गॅसची निर्मिती केली आहे. त्याचा वापर छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी केला असून अधिक मोठ्याप्रमाणात करण्याचा त्याचा मानस आहे.

वेल्डिंग मशीन

कोरोना काळात घरात बसून वेल्डिंग मशीन बनविले आहे. त्यासाठी केवळ 100 रुपये खर्च केला आहे. पाच लिटरचे प्लास्टिक कॅन, दोन नट बोल्ट, वायर व पकडीच्या साहाय्याने वेल्डिंग मशीन तयार केले आहे. त्याचा वापरही सुरू आहे.

कोळपणी यंत्र

9 हजार रुपये खर्चातून शेतात वापरण्यासाठी कोळपणी यंत्र बनविले आहे. त्यासाठी स्कूटर इंजिन, क्‍लच, ब्रेक, गिअर, एक्‍सलेटर आधी साहित्याचा वापर केला आहे. या मशिनच्या साह्याने ऊस, शेंगा, भात आदी पिकातील भांगलणी, भरणी, कोळपणी कामे सुरू आहेत.

लहानपणापासून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. टाकाऊ वस्तूंचा वापर करून दैनंदिन कामाच्या वापराची साधने बनवू शकतो. या विचाराने दोन वर्षांपूर्वी एक छोटे यंत्र बनवले. त्यानंतर सर्वांनी कौतुकाची थाप दिल्याने पुन्हा अशा कामांना प्रेरणा मिळाली.
- सौरभ खोत, शिवापूरवाडी

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.