Kagal : संजय घाटगेंची तलवार 'म्यान', समरजित फुंकणार 'तुतारी'? विधानसभेला 'हायव्होल्टेज' लढत होण्याची शक्यता

Kagal Vidhan Sabha election : मंत्री हसन मुश्रीफ निवडणुकीसाठी कायमपणे सज्ज आहेत. महायुतीकडून त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जाते.
Kagal Assembly Elections
Kagal Assembly Electionsesakal
Updated on
Summary

संजय घाटगे यांनी मुश्रीफांना दिलेला पाठिंबा कागल तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांना रुचलेला नाही.

कोल्हापूर : कागल विधानसभा निवडणुकीसाठी (Kagal Assembly Elections) महायुतीकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे निश्चित असताना महाआघाडीतील संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी आपली तलवार ‘म्यान’ केली आहे. पाच वेळा निवडून आलेल्या मुश्रीफ यांना रोखण्यासाठी ‘शाहू’ ग्रुपचे सर्वेसर्वा समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी कंबर कसली आहे. गेली पाच वर्षे ते अखंडपणे जनसंपर्कात आहेत.

त्यांना अपक्ष लढावे लागले तर अनेक मर्यादा येऊ शकतात. त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीने अन्य उमेदवार दिल्यास कागल मतदारसंघात तिरंगी लढत होऊन त्याचा लाभ मुश्रीफ यांना होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीकडून समरजित घाटगे यांनी निवडणूक लढविली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांना मिळू शकते. असे झाले तर कागलची निवडणूक हायव्होल्टेज होईल.

मंत्री हसन मुश्रीफ निवडणुकीसाठी कायमपणे सज्ज आहेत. महायुतीकडून त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जाते. त्यात संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांच्याबरोबर राहणार असल्याचे जाहीर करून त्यांना बळच दिले आहे. अशा स्थितीत समरजित घाटगे यांच्यासमोर अपक्ष किंवा महाविकास आघाडी असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. गेल्या निवडणुकीत समरजित यांनी अपक्ष निवडणूक लढवून चांगली मते मिळवली, पण ते विजयापर्यंत पोहोचले नाहीत.

Kagal Assembly Elections
'फडणवीस घाम पुसायला 3-4 रुमाल खिशात ठेवताहेत, आता निवडणुकीत त्यांना पाणी पाजणार'; जरांगे पाटलांचा थेट इशारा

समरजितसिंह यांना महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची संधी असतानाही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर लोकसभेच्या निवडणुकीत जी स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची झाली तशीच त्यांची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचे त्यांचे धाडस आत्मघातकी ठरू शकते.

मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि सर्वसामान्य जनतेत याची नकारात्मक चर्चा झाली. गेली अनेक वर्षे शरद पवारांच्या विचाराची नाळ कागल तालुक्याशी आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. शिवाय आपण ज्यांना मोठे केले त्यांनीच आपली साथ सोडल्याचे शल्य पवार यांना आहे. त्यातून अशा काहींच्या विरोधात तगड्या जोडण्या पवार यांच्या पातळीवर सुरू आहेत. त्यात मुश्रीफ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनाही सहानुभूती दिसते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार यांच्या वाट्याला जाणार असल्याने समरजितसिंह घाटगे यांनी ‘तुतारी’ हाती घ्यावी, अशी भावना आता मतदार गावोगावी व्यक्त करत आहेत.

संजय घाटगे गटातही नाराजी

संजय घाटगे यांनी मुश्रीफांना दिलेला पाठिंबा कागल तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांना रुचलेला नाही. राजकारणात मुश्रीफांसोबत केलेला संघर्ष संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते, मतदार विसरलेले नाहीत. त्यांच्यातून उघड नाराजी व्यक्त होत आहे. या नाराजीचा फायदाही आपसूकच समरजित घाटगे यांना मिळू शकतो.

Kagal Assembly Elections
'कुटिल, सूडाचे राजकारण करून विरोधकांना संपवण्याचा जयंत पाटलांचा प्रयत्न'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

पराभव मंडलिक गटाच्या जिव्हारी

माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा लोकसभेला झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशातच कागल तालुक्यातून कमी पडलेले मताधिक्य या कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. ‘लोकांनी निवडणूक हातात घेतली, आमचे मतदारांनी ऐकले नाही,’ या निकालानंतरच्या प्रतिक्रिया विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील उमटल्या, तर आश्चर्य वाटू नये. प्रा. मंडलिक महायुतीतच असल्याने ते मुश्रीफ यांचा प्रचार करतील यात शंकाच नाही. पण कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी दूर होणार का? हे काळच ठरवेल.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मैत्रीचा अडसर

महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवार गटाची ‘तुतारी’ घेऊन लढण्यात समरजित यांच्यासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीचा अडसर आहे. शरद पवार हे गडहिंग्लज आणि आजऱ्यात सतेज पाटील यांना सोबत घेऊन समरजितसिंह यांच्यासाठी उत्तम जोडण्या लावू शकतात. पण त्यावेळी फडणवीस यांच्याशी असलेले संबंध तोडून ते लढतील का? हा खरा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.