कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका झाडाच्या बुंध्यात रिकाम्या बिस्किट पुड्यात लपविलेल्या आणखी एक मोबाईल संचासह तीन बॅटऱ्या सापडल्या. प्रशासनातर्फे गुरुवारी सायंकाळी झालेल्या झडतीत हा प्रकार समोर आला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. कारागृहात पाठोपाठ तिसऱ्यांदा सापडलेल्या मोबाईलमुळे प्रशासनाने सुरक्षेत वाढ केली.
कारागृहात काही दिवसांपूर्वी एका मोटारीतून आलेल्या दोघा संशयितांनी तीन कापडी पुडके फेकले. त्यात १० मोबाईल, गांजा, पेन ड्राईव्ह, चार्जर कॉड, व्हिसील मिळून आले होते. कारागृहात सापडलेल्या १० मोबाईलची उच्चस्तरीय चौकशी कारागृह प्रशासनाने सुरू केली. यातच अधीक्षक शरद शेळके यांची पुण्याला तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी चंद्रमणी इंदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
इंदूरकर यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने कारागृहाची झडती सुरू केली. त्यात त्यांना अतिसुरक्षा विभागाजवळ एक मोबाईलसह चार बॅटऱ्या सापडल्या होत्या. दरम्यान, इंदूरकर यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा झडती घेतली. यात सर्कल क्रमांक सातसमोरील परिसरातील एका झाडाच्या बुंध्यात बिस्किटाचे लाल रिकामे पाकीट सापडले. त्यात हा मोबाईल सापडला. त्याच परिसरात मोबाईलच्या तीन बॅटऱ्याही सापडल्या. तशी इंदूरकर यांनी सुरक्षेत वाढ केली. याबाबतची फिर्याद कारागृह अधिकारी राकेश देवरे यांनी दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मोबाईल कारागृहात आला कसा...
झाडाच्या बुंध्यात सापडलेला मोबाईल व त्या तीन बॅटऱ्या कारागृहात कशा आणि कधी आल्या, त्याचा वापर झाला आहे का, यामागे कोणत्या बंदीचा किंवा अन्य कोणाचा हात आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम कारागृह प्रशासनाकडून सुरू झाले आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाचीही मदत घेतली जात आहे. काही बंदीचेही जबाब नोंदविण्यात आले असल्याचे समजते.
दोन्ही पातळीवर चौकशी सुरू
सापडलेल्या ११ मोबाईल प्रकरणाचा तपास पोलिस व कारागृह प्रशासन अशा दोन्ही पातळीवर सुरू आहे. यात पोलिसांकडून बंदीकडे चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. प्रशासकीय पातळीवरही काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.