Keshavrao Bhosale Theatre : केशवराव भोसले नाट्यगृहाचा ऐतिहासिक वारसा; कधी आणि कोणी केली स्थापना? गॅसबत्तीच्या उजेडात रंगले प्रयोग

Keshavrao Bhosale Theatre Fire : नाट्यगृहाच्या बांधकामाचा प्रारंभ १९१३ मध्ये झाला आणि १९१५ मध्ये ते पूर्ण झाले.
Keshavrao Bhosale Theatre History
Keshavrao Bhosale Theatre Historyesakal
Updated on
Summary

१९५७ मध्ये त्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण झाले. १९७९ पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले.

Keshavrao Bhosale Theatre Fire : विसाव्या शतकाचे स्वागत करतानाच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) रोममधील मैदानांच्या धर्तीवर खासबाग मैदान (Khasbag Maidan) आणि पुढे तीन वर्षांनी पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) उभारणीला प्रारंभ केला. नाट्यगृहाच्या बांधकामाचा प्रारंभ १९१३ मध्ये झाला आणि १९१५ मध्ये ते पूर्ण झाले. १९५७ मध्ये त्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण झाले. १९७९ पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले. १९८० ते ८४ व २००३ ते २००५ या काळात त्याचे नूतनीकरण केले.

गॅसबत्तीच्या उजेडात रंगले प्रयोग

नाट्यगृहाच्या लांबी-रुंदीचा विचार केला तर मधे कोणताही खांब आडवा न येता त्याचे छत बांधून हे त्या काळात आव्हान होते. परदेशातील नाट्यगृहांचा अभ्यास करून ही उभारणी झाली. माईक, स्पीकरसारखी व्यवस्था नसली, तरी व्यासपीठावरील आवाज व्यवस्थित शेवटपर्यंत पोचेल अशी रचना इथे केली. आवाज घुमणार नाही यासाठी अंतर्भागात लाकडाचे पृष्ठ, रंगमंचाच्या खाली पाण्याचा हौद आणि त्यावर लाकडाचा पृष्ठभाग, दोन्ही बाजूला देखणे, भक्कम, उंच लाकडी खांब, त्या दरम्यान नावाला शोभेल असा पडदा, नाटकाचे प्रत्येक प्रसंग प्रत्यक्षाचा भास घेऊन उभे राहातील, असे पडदे ही एकेकाळी इथली वैशिष्ट्ये ठरली होती.

Keshavrao Bhosale Theatre History
Keshavrao Bhosale Theatre : कोल्हापूरचा मानबिंदू केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख; नेमकं काय घडलं अन् कशामुळं लागली आग?

गॅलरीमध्ये लाकडाच्या पायऱ्या होत्या. त्यावरच बसून प्रेक्षक नाटक पाहू शकत. याच गॅलरीला रंगमंचाच्या समोर मोठे आरसे होते. कलाकारांना त्यामध्ये पाहता येत असल्याने चूक राहाण्याचा धोका कमी होत असे. आज हे आरसे काढून टाकले. छत्रपती शाहू महाराजांचे पेंटिंग दर्शनी भागात होते. १९२० मध्ये कोल्हापुरात वीज आली, तोवर गॅसबत्तीच्या प्रकाशात आणि माईकशिवाय नाटक, संगीत नाटक व्यवस्थित दिसेल आणि ऐकू येईल, अशी रचना हे या वास्तूचे वैशिष्ट्य होते. नंतरच्या काळात दुसरा मजला तयार करून बाबूराव पेंढारकर कलादालन सुरू केले. टाउन हॉलसमोर भाऊसिंगजी रोडवरील कमान व फेरीस मार्केटची (आताचे छत्रपती शिवाजी मार्केट) १८७८ ते १८८२ दरम्यान बांधलेली कमान उतरवून सध्या त्याची पुनर्रचना नाट्यगृहाची प्रवेशद्वार म्हणून करण्यात आली. त्याकामाचे उद्‌घाटन १९८० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.

पुन्हा निधी आला; पण तोही अपुरा

खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून शासनाने भरीव निधी दिला आणि त्यातून नाट्यगृह व मैदानाचे मूळ स्वरूप कायम ठेवून नूतनीकरण व संवर्धनाचा पहिला टप्प्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा अजूनही निधीच्या प्रतीक्षेत आहे. नाट्यगृहाचे सध्याचे काम पाहता ते अत्यंत देखणे आणि सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेच झाले आहे. फक्त रंगमंचाचा विचार केला तरी त्याची योग्य जपणूक केली, तर किमान शंभर वर्षे त्याला काही होणार नाही, एवढी खात्री दिली आहे. साउंड आणि लाईट सिस्टीम्स या सध्याच्या सर्वांत अद्ययावत सिस्टीम्स असून, त्यांची किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांच्या घरात आहे.

Keshavrao Bhosale Theatre History
Keshavrao Bhosale Theatre Fire : कलाकार, तंत्रज्ञांच्या अश्रूंचा बांध फुटला; माहिती देताना हुंदके, हृदयच जळून खाक झाल्याच्या भावना

मात्र, ही सारी यंत्रणा अगदी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची (उदा. साउंड ऑपरेटर, स्टेज असिस्टंट, गार्डनर, हेल्पर) भरती करणे अजूनही महापालिकेला शक्‍य झालेले नसल्यामुळेच अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर शहरात दुसऱ्या सुसज्ज नाट्यगृहाची मागणी जोर धरू लागली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या गौरव समारंभाचे निमंत्रण द्यायला गेल्यानंतर नाट्यगृहाबाबत चर्चा झाली आणि नवीन नाट्यगृहाबाबत काय करता येईल, त्याची माहिती तत्काळ देण्याविषयी त्यांनी महापौरांसह स्थानिक नेत्यांना सूचना दिल्या. विस्तारणाऱ्या कोल्हापुरात किमान अडीच हजार आसनक्षमतेचे नाट्यगृह असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनीही मांडली.

त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि अगदी पाच ते सहा दिवसांत नियोजित आराखड्याचे सादरीकरणही झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पाठपुराव्याअभावी हा विषय मागे पडला. त्याचवेळी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी साडेआठ कोटींहून अधिक निधीचा प्रस्ताव दिला गेला. त्यातून नाट्यगृह, खासबाग मैदान आणि परिसर विकास, साठहून अधिक चारचाकींची अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था, संरक्षक भिंतीसह खाऊ गल्लीचाही सुनियोजित विकास आणि तिकीट खिडकीसह नाट्यगृहांतर्गत विविध सुविधांचा त्यामध्ये समावेश केला. मात्र, याबाबतही कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही.

नाट्यगृहाची वैशिष्‍ट्ये

  • स्थानिक कलावंतांना मिळाले बळ

  • देश-विदेशातील मान्यवर कलकारांचे सादरीकरण

  • नाट्यगृहाच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण

  • मूळ वास्तुचे सात वेळा नूतनीकरण

  • आसन क्षमता ७१४

  • गॅलरी व मंच सागवानचा

  • अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा होती

  • सर्व व्यावसायिक नाट्यसंस्थाचे प्रयोग

  • ‘तो मी नव्हेच’ सर्वाधिक प्रयोग

Keshavrao Bhosale Theatre History
Keshavrao Bhosale Theatre Fire : राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला वारसा पुन्हा नव्याने उभारू...

कला सेवेचे साक्षीदार

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, कथ्थक नृत्यांगना डॉ. सुधा कांकरिया, गानसरस्वती किशोरी आमोणकर, देवकी पंडित यांचे शास्त्रीय गायनअभिनेते डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, यशवंत दत्त, प्रभाकर पणशीकर, प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे, चित्तरंजन कोल्हटकर, शरद तळवळकर यांच्यापासून ते आजचे आघाडीचे अभिनेते आनंद काळे, सागर तळाशीकर, अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार, लालन सारंग, वंदना गुप्ते, उषा नाईक, राजश्री खटावकर यांचे याच मंचावरून नाट्यक्षेत्रात पदार्पण

संगीत नाटक, लोककलेला बळकटी

  • जयमाला शिलेदार कुटुंबीयांचे संगीत सौभद्र, एकच प्यालाचे प्रयोग

  • १९७५ ते १९८५ च्या काळात वाद्यवृदांची परंपरा सुरू

  • ऑर्केस्ट्रा मेलडी मेकर्स, सेव्हन कलर्स, मिनल शहा, ते झंकार बिटचे प्रयोग

  • प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, गायिका कांचन, ड्रमिस्ट बाबला यांच्या कलेला बहर

  • काळू बाळू तमाशा मंडळ, मंगला बनसोडे तमाशा मंडळ यांच्यापासून ते लावणी कलावंत नृत्यांगना सुरेखा पुणेकर, वर्षा संगमनेरकर, रेखा नगरकरपर्यंतच्या अनेक आघाडीचे तमाशा -लावणी नृत्याचे कार्यक्रमांना येथे रसिकांचा उदंड प्रतिसाद

  • जादुगार रघुवीर व जादुगार भैरव यांचे सर्वाधिक प्रयोग

Keshavrao Bhosale Theatre History
Keshavrao Bhosale Theatre Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी तात्काळ 10 कोटींचा निधी जाहीर; राजेश क्षीरसागर यांची माहिती

टीटीएल खरेदी वेळच्या अनेक प्रश्‍नांना उत्तर

कोल्हापूर शहर एवढे मोठे आहे का, इथे टर्न टेबल लॅडरची (टीटीएल) आवश्‍यकता आहे का, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च कशाला, असे अनेक प्रश्‍न टर्न टेबल लॅडरच्या खरेदीवेळी उपस्थित झाले होते. त्याच लॅडरने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आग आटोक्यात आणली. लॅडरच्या उपयुक्ततेची प्रचिती कोल्हापूरकरांना आली. शहरात उंच इमारती उभारत असल्याने तेथे आग लागल्यास किंवा काही दुर्घटना घडली तर तत्परतेने आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेत टीटीएलच्या खरेदीचा विषय चर्चेत आला होता. हे आधुनिक यंत्र महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे असल्याने अनेक आपत्कालीन घटनांत त्याचा उपयोग होईल, असे सांगण्यात आले होते. तरीही टीटीएलच्या खरेदीवर बोट ठेवले होते. अखेर जपान, जर्मनी व्हाया कोल्हापूर असा प्रवास करत टीटीएल कोल्हापुरात पोहोचले. सुमारे दहा कोटी खर्च करून टीटीएल अग्निशमन दलात सामील झाले. विशेष म्हणजे शहरात २३ मजली इमारती होण्याची शक्यता गृहित धरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.