कोल्हापूर : महापूर, कोरोनामुळे व्यवसायाला फटका बसला होता. यंदा नवरात्रोत्सवात महाद्वार रोड खुला ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर दुचाकीसह रिक्षा वाहतुकीला मुभा दिली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप या मार्गावर बॅरिकेड्स न लावता तो मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी दसऱ्यातच दिवाळी साजरी करावी, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या हॉलमध्ये व्यापाऱ्यांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयाचे व्यापारी वर्गाने स्वागत केले.
कोविडचे निर्बंध उठले असल्याने यंदाचा नवरोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. मात्र, मुख्य मार्ग खुले नसल्याने त्याचा उपयोग व्यावसायिकांना होत नाही. महाद्वाररोड बंद करू नये, अशी मागणी व्यापारी वर्गांनी उचलून धरली होती. याच अनुषंगाने आज सकाळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दर्शन रांग, भवानी मंडप, महाद्वाररोडची पाहणी केली. त्यानंतर व्यापारी वर्गांसोबत बैठक घेतली.
पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी व्यापार खंडित होऊ नये यासाठी महाद्वाररोड, भाऊसिंगजी रोड खुला ठेवण्यात येणार आहे. फेरीवाल्यांशी वाद टाळण्यासाठी त्यांचीही बैठक घेण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनीही दुकानाच्या दारातील लोखंडी जाळ्या काढाव्यात, उत्सव काळापुरते वाहन ‘शेअर’ करावे, दुचाकीचा शक्यतो वापर करून कोंडी टाळावी, असे आवाहन केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, माजी नगरसवेक किरण नकाते, अजित ठाणेकर, बाबा निंबाळकर, माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सूचना मांडल्या. तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, ईस्टेट विभागाचे नारायण भोसले, सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रितम ओसवाल, सचिव तेजस धडाम, सदस्य शिवाजी पाटील, अशोक ओसवाल, विजय भोसले, परेश भेदा, मनोज बहिरशेठ आदी उपस्थित होते.
महाद्वार रोडवर सम-विषम पार्किंग
महाद्वाररोडवर सम-विषम पार्किंगचा प्रयोग प्रायोगितत्त्वावर करण्यात येणार आहे. याचे नियोजन शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण करत असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या सूचना...
भाविकांना बाजारात सहज पोचता यावे
पार्किंगला पर्याय द्या
महाद्वार रोडवर रिक्षाला परवानगी द्या
महाद्वार आणि ताराबाई रोडवरील अतिक्रमणे हटवा
फुल विक्रेत्यांसह रिक्षा थांब्याचे
नियोजन करा
बैठकीतील निर्णय...
महाद्वार रोड बॅरिकेड्स लावण्यात येणार नाहीत
छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप मार्ग राहणार खुला
गर्दीचे ठराविक दिवस वगळून वाहतुकीस परवानगी
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच मालवाहतुकीला मुभा
गर्दीसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार नियोजनात बदल
अतिक्रम निर्मूलन मोहिमेस पोलिस बंदोबस्त
मंदिर परिसरातील मार्गावर पॅचवर्कसह पट्टे मारणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.