कोल्हापूर: सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा. लॉटरी, बक्षीस, चांगला परतावा, अशी वेगवेगळी आमिषे आणि भूलथापांची त्यांना जोड द्यायची. थेट चित्रात न येता एका क्लिकद्वारे लाखोंचा ऑनलाइन दरोडा टाकून गुन्हेगार मालामाल होऊ लागलेत.
घरफोड्या, दरोडा, चोऱ्या अशा गुन्ह्यात थेट सहभाग घेण्याची जोखीम घेण्याची पद्धत गुन्हेगारांनी बदलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकटानंतर ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले. पण, अद्याप अशा व्यवहारांची सर्वसामान्यांना तितकीशी समज नाही. याचाच फायदा घेत त्यांच्या बँक खात्यावर दरोडा टाकण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून केले जाऊ लागलेत. ‘साहेब अभिनंदन, आपल्याला बक्षीस लागले आहे. तुम्ही आमच्या कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेता झाला आहात. तुम्हाला आलिशान मोटार अथवा हॉलीडे पॅकेज दिले जाणार आहे. तुम्हाला कॅश बॅक मिळेल, स्वस्तः वस्तूंची खरेदी करा, बँकेतून बोलतोय कागदपत्राची पूर्तता करा, अन्यथा तुमचे बँक खाते बंद करू, अशी वेगवेगळी आमिषे आणि भूलथापांद्वारे भामटे सर्वसामान्यांना लुटत आहेत. पाठविलेल्या लिंकवर क्लिक आणि ओटीपी, पासवर्ड शेअर करण्यास भाग पाडत आहेत. त्याआधारे संबंधिताच्या बँक खात्यावरील लाखोंच्या रकमेवर डल्ला मारू लागलेत. झारखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश आदी भागात अशा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. यासंबंधीच्या तक्रारीचे प्रमाण सायबरसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात वाढू लागले.
शहरातील एका बँकेचे तीन एक वर्षापूर्वी खाते भामट्याने सुटीच्या दिवशी हॅक करून लाखोंची रक्कम परस्पर काढून घेतली. दीड महिन्यापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील एका राष्ट्रीकृत बँकेतील अनेक खातेदारांच्या मोबाईलवर परस्पर पैसे काढल्याचे संदेश आले. तसे ते हवालदिल झाले. त्यांनी थेट बँकेसह पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी भामट्याने हा प्रकार एटीएम कार्ड क्लोनिंग (बनावटीकरण) करून केल्याचे पुढे आले. अज्ञान आणि एखाद्या चुकीमुळे कष्टाने कमविलेल्या आयुष्यभराच्या सर्वसामान्यांच्या पुंजीवर भामटे डल्ला मारू लागलेत.
आठ लाखांचा गंडा...
एका बँकेतील ग्राहकाने खात्याला लिंक केलेला मोबाईल क्रमांक वापरणे बंद केले. पण, याची माहिती ग्राहकाने बँकेला दिली नाही. दरम्यान, मोबाईल कंपनीने ठराविक काळानंतर तो क्रमांक दुसऱ्याला दिला. खात्याच्या व्यवहारासंबंधीचे अपडेट त्याला मिळू लागले. त्याआधारे त्याने संबंधित बँकेशी संपर्क साधून ऑनलाइन व्यवहाराद्वारे आठ लाखांहून अधिकची रक्कम परस्पर काढून घेतली. बँकेला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरही भामट्यांची नजर असल्याचा प्रकार सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे आला.
काळानुरूप गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चालले आहे. हातात नंग्या तलवारी नाचवत होणारी गुन्हेगारी आता बाजूला पडली आहे. ऑनलाइन फसवणूक, हनी ट्रॅप, स्किमद्वारे फसवणूक, आमिषे दाखवून फसवणूक, अंमली पदार्थांची, वनौपजाची तस्करी अशा एक ना अनेक पद्धतीची गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. जग बदलत चालले आहे, तशी गुन्हेगारीही बदलू लागली. त्याचा आढावा घेणारी ही वृत्तमालिका आजपासून....
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.