कोल्हापूर : महिन्याचा शेवटचा आठवडा सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांनी गाजणार आहे. ३० ऑगस्टला जिल्हा दूध संघ ‘गोकुळ’ची, तर ३१ ऑगस्टला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची (केडीसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.
गोकुळच्या सभेत बोरवडे शीतकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी (उदगाव) येथील लगतची जागा खरेदी करण्यास मंजुरी घेण्यासोबतच इतर महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. तसेच जिल्हा बॅंकेत पोटनियम दुरुस्तीसह बाहेरील कर्ज उभारणी मर्यादा निश्चित करण्यासह इतर विषय सभेपुढे असणार आहेत.
सहकारातील दोन प्रमुख संस्थांसह पतसंस्था, बॅंकांच्याही सभांचे आयोजन आहे.
सहकार संस्थांच्या नियमानुसार ३० सप्टेंबरअखेर वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्या लागतात. त्यानुसार जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० ऑगस्टला होत आहे. पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यावर दुपारी एक वाजता सभा होणार आहे. एकूण बारा विषय अजेंड्यावर आहेत.
त्यांपैकी जागा खरेदीसह पोटनियमांतील बदलास मंजुरी, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय हे चर्चेचे विषय ठरू शकतात. तसेच केडीसीसीची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्टला दुपारी बारा वाजता कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होत आहे. सभेसमोर दहा विषय असणार असून बॅंकेच्या पोटनियम ३.३. मध्ये सुधारण्यासह इतर विषय असणार आहेत.
अहवालाच्या मुखपृष्ठाचे वेगेळेपण
जिल्हा बॅंकेच्या अहवालावरील मुखपृष्ठावर बॅंकेची डिजिटल वाटचाल छायाचित्राच्या माध्यमातून दाखविली आहे. कोल्हापूरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नील सुरेश कुसाळे यांच्या छायाचित्राला विशेष स्थान दिले आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये ५० मीटर एकर रायफल प्रकारात ‘कास्यपदक’ मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. गोकुळच्या अहवालाचे मुखपृष्ठाचेही वेगळे वैशिष्ट्य आहे. २०२३-२४ हे वर्ष ‘वैरण विकास वर्ष’ म्हणून साजरे केले आहे. त्याचा संदर्भ देऊन मुखपृष्ठ बनविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.