कोल्हापूर : ‘ऑनलाईन’ कर्जातून बदनामीचा फंडा

‘कॉन्टॅक्ट लिस्ट’ जाते हॅकरकडे अश्‍लील छायाचित्रे व्हिडिओ कॉलद्वारे दिला जातो मानसिक त्रास
online
online sakal media
Updated on

कोल्हापूर: चार-पाच दिवसांसाठी ऑनलाईन कर्ज दिले जाते; मात्र त्याची परतफेड केल्यानंतरही वसुलीचा तगादा लावला जातो. संबंधितांना कॉल करून तुमची बदनामी केली जाते. ऑनलाईन कर्ज घेताना तुमच्या मोबाईलमधील ‘डाटा हॅक’ करून तुम्हाला ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याचा नवा फंडा जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन कर्ज घेताना सावध राहा!, शक्यतो घेऊ नका, ऑनलाईन कर्ज घेणारे ॲपसुद्धा डाउनलोड करू नका. ऑनलाईन कर्जावर बदनामी फ्री अशा पद्धतीने आता फसवणूक सुरू आहे.

तुम्हाला कमी मुदतीसाठी दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवसांसाठी ऑनलाईन कर्ज दिले जाते. यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होते. तासात हे पैसे तुमच्या अकाऊंटवर दिले जातात, मात्र त्याची परतफेड मुदतीत करूनही तुमच्याकडे पुन्हा पैशांची मागणी होते. तुम्ही कर्ज घेताना त्यांना दिलेल्या ॲक्सेसनुसार तुमच्या मोबाइलमधील सर्व कॉन्टेक्ट लीस्ट, डाटा हॅकरकडे जातो आणि त्याचा वापर तुम्हाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी होतो. त्यात तुमची बदनामी करण्यासाठी तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना तुमच्याबद्दल चुकीचे मॅसेज दिले जातात. थेट संभाषण करून चुकीचे सांगितले जाते. संबंधितांची छायाचित्रे अश्‍लील पद्धतीने मिक्सिंग करून सर्वांना पाठविली जातात. जिल्ह्यात दिवसाला सात-आठ व्यक्तींची अशी फसवणूक होते. सध्या एकाच व्यक्तीला ६९ वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येऊन बदनामी करून मनस्ताप दिल्याची माहिती सायबर सेलमधून दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येईल, त्या क्षणाला ॲप अनइन्स्टॉल करावे. ‘ब्रॉडकास्ट लिस्ट’द्वारे संबंधितांना ‘एसएमएस’ करून फसवणूक झाली आहे, याची माहिती द्या. त्यांना कॉल गेले किंवा त्यांच्याकडे तुमच्याबद्दल कोणत्याही पोस्ट गेल्या तरीही ते गांभीर्याने घेणार नाहीत. स्वतःची फसवणूक झाल्याचा स्टेटस्‌ ठेवला तरीही तो हॅकरला दिसतो. याचाही विचार करा, अशी फसवणूक झाल्यास सायबर सेलकडे तक्रार करा.

- सुधीर पाटील, पोलिस नाईक, सायबर टीम.

कर्जाचे ॲप अनइन्स्टॉल करा

ऑनलाईन कर्ज देण्याचे अनेक ॲप आहेत. ते मोफत अपलोड होतात. अनेकांकडून ते स्टोअर केले जातात. यानंतर काहीवेळा नोटिफिकेशन येतात. काहीवेळा टाईमपास म्हणून ऑनलाईन कर्जासाठी प्रयत्न होतो. येणाऱ्या अपडेटमध्ये आपली संमती देतो. यानंतर सर्व डाटा त्यांच्याकडे (ॲप, हॅकरकडे) जातो. असे ॲप शक्यतो डाउनलोड करू नये. केले असल्यास ते अनइन्स्टॉल करावेत, असा सल्ला सायबरसेलचे निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.