कोल्हापूर: घोगरा, खिरीट, टाकळी, खरप्या, मुळी, झिंगा या माशांच्या जाती आता पंचगंगा नदीमधून नामशेष झाल्याचे येथील मच्छीमार सांगतात. आणखी काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण याला कारणीभूत आहे. अनेकदा संबंधित कारखान्यांना नोटीस पाठविणे, उपाययोजना करण्याचे देखावे केले जातात. प्रत्यक्षात कोणावर कारवाई झाली किंवा शिक्षा झाली, असे आढळले नाही, असेही मच्छीमारांकडून सांगण्यात येते. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे नष्ट होत असलेल्या माशांच्या जाती जतन करणे शक्य होईल.
साखर कारखान्यांचे हंगाम संपताना त्यांच्याकडून नदीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे तसेच मळीमुळे पंचगंगा नदीचे पाणी ठराविक काळात दूषित होते. यातून हजारो मासे मृत्युमुखी पडतात. जेव्हा मोठे मासे मृत होतात, याच वेळी नवीन प्रजनन सुरू असणाऱ्या माशांसह छोट्या माशांचा जीव धोक्यात येतो. परिणामी, कालांतराने माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. मच्छीमारांच्या सांगण्यानुसार १५ वर्षांत किमान आठ ते दहा माशांच्या प्रजाती नष्ट झाल्याचे दिसून येते. मासे मृत होतात, तेव्हा आंदोलने होतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कागदोपत्री कारवाई करतात. मात्र, कोणाला शिक्षा झाली आहे, असे काही अलीकडच्या काळात आढळल्याचे दिसत नाही. परिणामी, प्रदूषण करणारे मोकाट असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येते.
प्रत्यक्षात पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम माशांकडून केले जाते, तरीही काही जणांकडून मासेमारीमुळे नदी प्रदूषित होत असल्याचा आरोप केला जातो. या उलट स्थानिक मच्छीमारांनी याबाबत गैरसमज पसरवू नये, अशा आशयाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. माशांच्या प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.
पुनर्वापर व भूगर्भभरणाचा प्रकल्प यशस्वी
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचा सात वर्षांपासून लाखो लिटर पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर व भूगर्भभरणाचा प्रकल्प सुरू आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे. असोसिएशनने आपल्या १३ हजार स्क्वेअर फूट जागेतील इमारतीच्या गच्चीतील पावसाचे पाणी फिल्टर करून शोषखड्डा व विहिरीत सोडून तेच पाणी आरओ तंज्ञज्ञानाने प्रत्येक सभासदासाठी उपलब्ध केले आहे. प्रत्येक सभासदाला महिन्याला शंभर लिटर पाणी मोफत दिले जाते. बिगर सभासदांना ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर पाणी दिले जाते. पावसाचे पाणी गटारातून जाऊन नदीला फुग येऊ नये, यासाठी शोषखड्डा काढून त्यात त्याचे निर्गतीकरण केले. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.
- बाबासाहेब कोंडेकर, माजी अध्यक्ष
आम्ही सहभागी, तुम्हीही व्हा..!
पंचगंगा वाचवा मोहिमेत सायबर महाविद्यालय एमबीए विभाग, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशन, प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, देवराई (डेव्हलपमेंट रिसर्च अवेअरनेस ॲण्ड ॲक्शन इन्स्टिट्यूट), गार्डन्स क्लब, पंख फाउंडेशन, व्हाईट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी, हिंदू युवा प्रतिष्ठान, रंकाळा वॉकर्स, अरिहंत जैन फाउंडेशन, दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूट, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, अर्थ वॉरियर्स, कलासाधना मंच, सार्थक क्रिएशन्स, डॉ. आझाद नायकवडी लोककला, सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन, पोलिसमित्र रेस्क्यू फोर्स, राजारामपुरी युवक मित्रमंडळ आदी संस्था सहभागी होणार आहेत. ‘पंचगंगेला वाचविण्यासाठी आम्ही सहभागी होतोय, तुम्ही व्हा’ असे आवाहन त्यांनी केले.
पंचगंगा म्हणजे पाच नद्यांचा संगम. प्रत्येक नदीचा उगम पाहिला तर तेथे स्वच्छ व नितळ नदीचा अनुभव आपल्याला मिळतो. प्रत्यक्ष पंचगंगेची परिक्रमा करताना तर तिचे नितळ स्वरूप अधिक ठळकपणे जाणवते. मात्र, कोल्हापूर शहराच्या जवळ येऊ, तसे चित्र बदललेले दिसते. पुढे नृसिंहवाडीपर्यंतचे चित्र तर भयानक आहे. ते बदलायचे असेल तर आता समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे.
- अशोक रोकडे, व्हाईट आर्मी
पंचगंगा नदीमधील नामशेष झालेल्या जाती : घोगरा, खिरीट, टाकळी, खरप्या, मुळी, झिंगा
कोल्हापूर शहर परिसर, तसेच जिल्ह्यातील आणि एक-एक माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत, काही होत आहेत. यामुळे सुमारे ३० ते ३५ टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पावले उचलून प्रदूषणामुळे पंचगंगा नदीतील मासे मृत होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत.
- नामदेव तिकोने,मासे व्यवसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.