शाहूवाडी : पिशवीपैकी खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथील मांडलाई पठार परिसरात पिसोरा (गेळा) व सशांची शिकार करणाऱ्या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे शिकार केलेल्या दोन पिसोरा, दोन ससे, बंदुका, काडतुसे सापडली. काल (ता. २६) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या पाचही संशयितांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवार (ता. ३०)पर्यंत कोठडी दिल्याची माहिती मलकापूर परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. दरम्यान, या घटनेतील अन्य दोघे फरारी झाले आहेत.
प्रवीण विश्वास बोरगे (२९), बाजीराव बाबू बोरगे (४५), मारुती पांडुरंग वरे(३०), संजय हिंदूराव भोसले (३३), रामचंद्र बाबू बोरगे (३२) (सर्व रा. वरेवाडी, ता. शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर आबाजी बाजीराव बोरगे व अमोल शिवाजी रवंदे हे दोघे पसार झाले आहेत. याबाबत वन विभागातून मिळालेली आधिक माहिती अशी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडलाई पठार परिसरात गुरुवारी (ता. २६) रात्री काहीजण शिकारीसाठी गेले होते. मिळालेल्या माहिती प्रमाणे वनविभागाच्या पथकाने मांडलाई पठारावर खोतवाडी ते कुंभारवाडी दरम्यान रात्री दहा पासून पाळत सुरू केली.
त्यावेळी या परिसरातील हूलवाणी नावाच्या ठिकाणी रात्री बाराच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आला. तर त्यानंतर साडेबाराच्या सुमारास दोन मोटारसायकल (एमएच ०३ सीई ७९३९ व एम.एच. १४बी.एन.३२०४) प्रवीण बोरगे, बाजीराव बोरगे, मारुती वरे, संजय भोसले हे चौघेजण जात असलेचे दिसले. त्यांना वन विभागाच्या पथकाने अडवून तपासणी केली असता त्यांचेकडे मारलेले दोन पिसोरा व दोन ससे, तेरा जिवंत काडतुसे, ६ वापरलेली काडतुसे असा मुद्देमाल सापडला. पथकाने मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आबाजी बोरगे पसार झाला.
दरम्यान, चौकशी चालू असताना दीडच्या सुमारास दुसऱ्या दुचाकी गाडीवरून रामचंद्र बाबू बोरगे व अमोल शिवाजी रवंदे मारलेल्या प्राण्याचे मांस घेऊन जात असलेचे दिसते. त्यांना थांबवताना पथकातील कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. त्यात पाठीमागे बसलेला रामचंद बोरगे सापडला. पण अमोल रवंदे गाडीसह पसार झाला. सापडलेल्या तीन बंदुकांपैकी एक परवानाधारक तर दोन गावठी आहेत.
या घटनेबाबत परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले म्हणाले, ‘‘मारलेल्या प्राण्यासह मास मिळालेले आहे. हे मास सध्या सश्याचे असल्याचे प्रथम दर्शनी वाटते पण ते नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे ते फॉरेन्सिक तपासणीनंतर कळेल. पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून यामध्ये आणखी कितीजण सामिल आहेत याचाही तपास सुरू आहे.
कारवाई पथकात सहायक वनसंरक्षक सुनील निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचे परिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, वनरक्षक अक्षय चौगुले, रूपाली पाटील, विठ्ठल खराडे, दिग्वीजय पाटील, जालंदर कांबळे, आशिष पाटील, वनपाल मेहबूब नायकवडी, वनसेवक शंकर लवटे, रामचंद्र केसरे, बाबाजी पाटील आदींचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.