Kolhapur : शेंडापार्कात आयटी पार्क मंजूर करा,दोन लाख तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवावा’-मंत्री हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांची मागणी : राष्ट्रवादीच्या उत्तरदायित्व सभेला प्रतिसाद
kolhapur news
kolhapur news sakal
Updated on

कोल्हापूर- ‘शेंडापार्कात आयटी पार्क मंजूर करून दोन लाख तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवावा’, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी द्यावा, असेही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) आयोजित उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते. तपोवन मैदानावर या विराट सभेचे आयोजन केले होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूर शहराला स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी अजित पवार यांनी थेट पाईपलाईन योजना मंजूर करून ५०० कोटी रुपयांचा निधी दिला. सारथीचे उपकेंद्र उभारण्यासाठी मंजुरी, तर नगरोत्थानमधून सुंदर कोल्हापूरसाठी शंभर कोटी रुपये दिले.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी अडीचशे कोटींचा आराखडा असून, त्यासाठी दहा कोटी रुपये दिले. शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवासाठी पन्नास कोटी, तर न्यायसंकुलासाठी निधी दिला. जिल्हाधिकारी कार्यालय, केशवराव भोसले नाट्यगृहासाठीसुद्धा निधी दिला. जिल्ह्याचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. अंबाबाई मंदिराचा सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा, कोल्हापूर हद्दवाढ, खंडपीठ निर्मिती हे विषय सुटणे आवश्‍यक आहे.

kolhapur news
Kolhapur News : इचलकरंजीत पत्नीवर कोयत्याने हल्ला,चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात कृत्य

जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल व विविध सुविधांसाठी ७०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, त्याचे उद्‌घाटन डिसेंबरमध्ये करण्यात येईल. जिल्हा बँकेच्या विस्तारीत इमारतीसह अन्य कामांच्या उद्‌घाटनासाठी गृहमंत्री अमित शहा यांना पवार यांनी कोल्हापुरात आणावे.’

प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्‍वावर पुण्याने शिक्कामोर्तब केले असून, ते नवे पर्व घडविण्याची ताकद असलेला नेता आहे. राजकारणात काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तसा सामुदायिक निर्णय घेऊन आम्ही सत्तेसाठी नव्हे तर लोकांच्या कल्याणासाठी महायुतीत सामील झालो.’

अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री पवार यांच्या मागे राष्ट्रवादी खंबीर आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकांसाठी सत्तेत सहभागी झालो. सत्तेत गेलो तर लोकांना न्याय देण्याची भूमिका घेता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्तेत गेले नसते, मंत्री झाले नसते तर न्याय देऊ शकले नसते.’

kolhapur news
Kolhapur Rain Update : ‘राधानगरी’चा स्वयंचलित दरवाजा उघडला, राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, ‘समतेच्या पुरोगामी विचाराने सत्तेत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. ही कोणावर आरोप करण्यासाठी नाही, की उत्तराची सभा नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांची उत्तरदायित्व सभा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत.

कोल्हापुरात येऊन मंत्री मुश्रीफ यांच्यावर खालच्या पातळीवर येऊन आरोप करणारे कोण आहेत? हे कोल्हापूर असून, येथे पायताण कसे बांधायचे, ते पायात कसे घालायचे आणि कोणाचे काही चुकल्यावर हातात कसे घ्यायचे, हे कोल्हापूरकरांना माहीत आहे. बीड व कोल्हापूरचे नाते वेगळे असून, मुश्रीफ बीड जिल्ह्याचे जावई आहेत. तसाच कोल्हापूर जिल्हा ऊस पिकविणारा तर बीड जिल्हा ऊस तोड मजुरांचा आहे.’

आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर नरसिंग गुरुनाथ पाटील, बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. आज तोच झेंडा मी हाती घेतला आहे.’

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘मी दहा वर्षे आमदार असताना अजित पवार यांचे महाराष्ट्र हिताचे राजकारण जवळून पाहिले आहे. त्यांना अनेक प्रश्‍नांची जाण असून, ते झोकून देऊन काम करणारे आहेत.’

kolhapur news
Kolhapur NCP Sabha : उपमुख्यमंत्रिपदी विराजमानानंतर अजितदादा पहिल्यांदाच बालेकिल्‍ल्‍यात; कोण-कोण लागणार गळाला?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘आजच्या सभेचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याखेरीज राहणार नाहीत. उपमुख्यमंत्री पवार अठरापगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करत आहेत. कार्यकर्ते एकीकडे नेते दुसरीकडे, अशी टीका होत असली तरी आजच्या सभेने कार्यकर्ते कोणाकडे आहेत, हे स्पष्ट झाले आहे.’ या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष ए‌. वाय. पाटील, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, पार्थ पवार उपस्थित होते.

पाठीवर हात ठेवून लढ म्हणावे

‘उपमुख्यमंत्री पवार यांनी पाठीवर हात ठेवून लढ म्हणावे. आम्ही रात्रीचा दिवस करू. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून पाच आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणू आणि पवार यांनी मुख्यमंत्री करू, असे सांगत आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकरी प्रोत्साहन भत्ता रक्कम द्यावी. चंदगड परिसरात कारखाना बांधण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली.

काळम्मावाडी दुरुस्तीला निधी

काळम्‍मावाडी धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्‍न आहे. या कामासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. हा सर्व निधी देण्याची तयारी आहे. मात्र, ३१ मार्च २०२४ पूर्वी खर्च होणे आवश्यक आहे. इतका खर्च होणार नसेल तर ४० कोटी रुपये देखील देण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.

सभेला प्रचंड गर्दी

या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. सर्व तालुक्यातून लोक आले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अजित पवार यांचे आगमन झाल्यानंतर जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आणि विद्युतरोषणाई करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

भुजबळांनी टाळली शरद पवारांवर टीका

बीडच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीAकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात टीका होऊ लागली. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्यासह सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात श्री. पवार यांच्यावरील थेट टीका टाळली. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ते सर्वोच्च न्यायालयात टिकणारे हवे. आरक्षण देताना ओबीसी व दलित समाजावर अन्याय होणार नाही किंवा समाजात विद्वेष निर्माण होणार नाही, याची सर्व नेत्यांनी काळजी घ्यावी’, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.