Kolhapur : हिंदू बांधव, भगिनींचा जनआक्रोश

सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहादविरोधी मोर्चासकाळ
भगवे झेंडे,
भगवे झेंडे,sakal
Updated on

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, भारता माता की जय’ या घोषणांनी आज शहर दणाणून गेले. भगवे झेंडे, लव्ह जिहादविरोधी फलक हातात घेऊन हजारो हिंदू बांधव आणि भगिनी हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले. भव्य मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या. सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

बिंदू चौकात सकाळी १० वाजल्यापासून विविध संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले. पाहता पाहता बिंदू चौक गर्दीने फुलून गेला. भगव्या टोप्या, भगवे झेंडे यामुळे सारे वातावरण भगवेमय झाले होते. त्यानंतर मंत्रोच्चारात धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली. सर्वात पुढे धर्मध्वज होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारता माता यांची प्रतिमा घेऊन धारकरी उभे होते.

त्या पाठीमागे सर्व महिला रांगेने चालत होत्या. बिंदू चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे हा मोर्चा भवानी मंडपाच्या कमानीबाहेर आला. या वेळी मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लव्ह जिहादला विरोध करा, धर्माचे रक्षण करा’, ‘श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताबला फाशी द्या’ अशा फलकांतून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. जागोजोगी मंडळांनी मोर्चाचे स्वागत केले.

या मोर्चामध्ये खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, सत्यजित कदम, सुनील कदम, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, महेश जाधव, अशोक देसाई, किशोर घाटगे, ॲड. सुधीर जोशी, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे, महेश उरसाल, सुनील पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे सहभागी झाले.

मोर्चासाठी पाणी, लाडू नाश्‍‍त्‍याची व्यवस्था

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी तसेच पोलिसांसाठी आयोजकांच्या वतीने नाश्‍‍त्‍याची व्यवस्था करण्यात आली होती. संतोष ऊर्फ आप्पा लाड, विशाल शिराळकर, मिलिंद कणसे, महेश ढवळे, बाळासाहेब मुधोळकर यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. महाद्वार रोडवर परशुराम क्रिकेट चषक आयोजकांच्या वतीने राजगिरा लाडू देण्यात आले.

गुजरी कॉर्नर येथे सराफ असोसिएशनच्या वतीने मोर्चेकरासांठी भात आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी तेजस धडाम, किरण नकाते, माधुरी नकाते, सुहास लटोरे, प्रितम ओसवाल, कुलदीप गायकवाड, किरण गांधी, सत्यजित सांगावकर, जयंत गोयाणी, मनोज बहिरशेठ उपस्थित होते.

पारंपरिक वेशभूषा व शस्त्रांचे प्रदर्शन

या वेळी जुना बुधवार पेठ येथील शिवकालीन युद्ध कलेच्या आखाड्यातील खेळाडूंनी मावळ्यांचा वेश परिधान केला होता. त्यांनी तलवार, दांडपट्टा, विटा, जांबिया, कट्यार, भाला या शस्त्रांव्दारे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पोस्टर

छत्रपती शिवाजी महाराज यांचे १०० बाय ४० फुटांचे भव्य डिजिटल पोस्टर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन क्रेनच्या साहाय्याने उभे करण्यात आले होते. यावर लव्ह जिहाद विरोधातील मजकूर, कायदा करण्याची मागणी होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हे फलक उभारण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.