कुडित्रे : जिल्ह्यात यशवंतराव घरकुल योजनेत भटक्या जाती, विमुक्त जमाती लाभार्थ्यांची फरपट सुरू आहे. १७२ लाभार्थ्यांना मंजुरी मिळूनही निधी प्राप्त झालेला नसून, जिल्ह्यात एकूण २७९ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे लाभार्थी ज्या-त्या पंचायत समितीला हेलपाटे मारताना दिसत आहेत. तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
या योजनेत धनगर, भटक्या जाती, विमुक्त जमाती यांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना २६९ चौरस फुट घर बांधण्यासाठी एक लाख २० हजार रुपये लाभ दिला जातो. आज या पैशांमध्ये महागाई वाढल्याने एक खोली व एक शौचालय पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. योजनेत लाभार्थ्याचे नाव निश्चित झाल्याने अनेक लाभार्थ्यांनी आणखी एक खोली बांधण्यासाठी कर्ज उभारणी केली आहे. मात्र निधी उपलब्ध न झाल्यामुळे कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड लाभार्थ्यांच्यावर बसत आहे. त्यामध्ये हातकणंगले व करवीर तालुक्यात बहुतांश लाभार्थी आहेत. करवीरमध्ये ८७ लाभार्थी आहेत, यापैकी १५ लाभार्थ्यांना निधी प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात २०१९-२० मधील ९७ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२१-२२ मधील १७२ लाभार्थी असून या १७२ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली. मात्र निधी प्राप्त झालेला नाही, समाज कल्याण विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात एकूण २७९ लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
या योजनेला राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्याकडून निधी मिळतो. संचालकांना याबाबत जिल्हा परिषद कडून पत्र व्यवहार करण्यात आला असून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली जात आहे.
२०१९-२० मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना सुरू झाली. या योजनेसाठी घर बांधणीसाठी प्रस्ताव पंचायत समित्या ना येत असताना शासनाचे उद्दिष्ट आलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नसल्याने योजनेचा फज्जा उडाला आहे.
करवीरमध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. निधी तातडीने उपलब्ध व्हावा. महागाई वाढली असल्याने अनुदानात वाढ व्हावी.
- विजय भोसले,माजी उपसभापती,पंचायत समिती, करवीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.