कागल : कोरोना लॉकडाउन काळात बंद करण्यात आलेला येथील शाहू स्टेडियमवरील वाय. डी. माने (अण्णा) जलतरण तलाव अद्याप सुरूच झालेला नाही. जलतरण तलाव बंद राहिल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, लवकरच शाळांना सुट्या लागणार आहेत. अनेकांना आपल्या लहान मुला-मुलींना पोहायला शिकवायचे आहे. त्यामुळे हा जलतरण तलाव कधी खुला होणार? याकडे बालचमूसह शहरवासीयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कागल पालिकेच्या माध्यमातून श्री शाहू स्टेडियमच्या जागेत वाय. डी. माने (अण्णा) जलतरण तलाव सुरू करण्यात आला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्या हस्ते १६ मार्च २००८ ला याचे उद्घाटन करण्यात आले. १ एप्रिल २००८ पासून हा जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला करण्यात आला.
या जलतरण तलावामुळे शहरातील महिलांसह आबालवृद्धांची पोहण्याची चांगली सोय झाली होती. या तलावाला १५ वर्षे पूर्ण झाली. गेल्या काही वर्षात या जलतरण तलावात अनेक जलतरण पटू तयार झाले. त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. वयाच्या पन्नाशी नंतरही काही वयस्क मंडळी या तलावात पोहायला शिकले.
दरम्यान, सन २०२० मध्ये कोरोना काळात दक्षतेचा उपाय म्हणून हा जलतरण तलाव बंद करण्यात आला. गेली तीन वर्ष हा तलाव बंद अवस्थेत आहे. या जलतरण तलावाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडला आहे. त्याची दुरुस्ती करून मोटर बसविणे गरजेचे आहे. तसेच लहान आणि मोठ्या जलतरण तलावाची डागडुजी करणे अत्यावश्यक आहे. आता उन्हाळ्यात शहरातील मुलांसह महिला व नागरिकांकरिता हा जलतरण तलाव सुरू होणे गरजेचे आहे.
एकमेव पर्याय
लहान वयातच मुला-मुलींना पोहायला शिकविले जाते. नदीकाठच्या गावातील मुले-मुली लहानपणीच पोहायला शिकतात. पण, शहरातल्या मुला-मुलींनी कोठे पोहायचे व कोण शिकविणार, याची अडचण होते. अनेक पालकांना पोहता येत नाही.
त्यामुळे ते आपल्या मुला-मुलींना पोहायला शिकवू शकत नाहीत. त्यासाठी जलतरण तलाव हाच एकमेव पर्याय असतो. हीच गोष्ट लक्षात ठेवून तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींना या तलावात पोहायला शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यातून ३० ते ३५ मुली पोहायला शिकल्या.
जलतरण तलाव तीन वर्षांपासून बंद आहे. सध्या त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. प्रशासकीय मंजुरी व निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.
- श्रीराम पवार, मुख्याधिकारी तथा प्रशासक, कागल नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.