कोल्हापूर : ऑनलाईन बांधकाम परवानगीची स्थिती; तांत्रिक माहितीचा अभाव

निम्मे प्रस्ताव गेले परत
kolhapur
kolhapursakal
Updated on

कोल्हापूर : नगररचना विभागाकडून दिली जाणारी बांधकाम परवानगी तसेच अन्य कामांसाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी तीन महिन्यांपासून ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली. आजतागायत १७३ प्रस्ताव विभागाकडे दाखल झाले असले, तरी त्यातील तांत्रिक माहितीअभावी निम्म्याहून जास्त प्रस्ताव त्रुटी दुरुस्तीसाठी परत पाठविले जात आहेत. त्यामुळे पूर्वी ‘टीपी’मध्ये चकरा माराव्या लागत होत्या. आता ऑनलाइनद्वारे पुनःपुन्हा प्रस्ताव सादर करावे लागत आहेत.

बांधकाम परवानगीसाठी मारावे लागणारे हेलपाटे, ‘अर्थ’कारणाशिवाय शिजत नसलेली डाळ याबाबत नागरिक, व्यावसायिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. त्यासाठी सरकारने ऑनलाइन यंत्रणा राबविण्याचे ठरविले. ती राबविण्यापूर्वी जुन्या यंत्रणेला मुदतवाढ देण्यात आली. यानंतर १ जुलै २०२२ पासून ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. प्रस्ताव आपापल्या आर्किकेक्ट, इंजिनिअरकडून ऑनलाइन पाठविणे व त्याचा पाठपुरावा करायचा होता. या यंत्रणेला तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. या कालावधीत निव्वळ बांधकाम परवानगीच्या ७० प्रस्तावांसह अन्य कामांचे १७३ प्रस्ताव नगररचना विभागाकडे दाखल झाले. त्यातील ८० हून अधिक प्रस्ताव जरी योग्य असले तरी त्यात असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी विभागाकडून संबंधित आर्किटेक्ट, इंजिनिअरकडे परत पाठविले आहेत.

एकूण जागेवर नियमानुसार आराखडा बसविला जातो. पण, ती जागा कुठे आहे, त्याला अप्रोच रस्ता किती मीटरचा आहे, ऑफसेट किती हे पाहिले जात नाही. एखादी गल्ली छोटी असेल तर त्यातून चारचाकी जाणे शक्य नाही. परंतु, तिथे चारचाकी पार्किंग आराखड्यात दाखविले असेल तर त्याची अंमलबजावणी शक्य होईल का, हे संगणकावर आराखडा बनविणाऱ्याला माहीत नसते. तो प्रस्ताव आल्यावर तपासणी करण्यास सुरुवात झाल्यावर सर्वेअर, कनिष्ठ अभियंत्यांकडून ते स्पष्ट होते. त्यामुळे यांसारख्या त्रुटी दूर करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे निम्म्याहून जास्त प्रस्ताव यासारख्या तांत्रिक त्रुटी असल्याने परत पाठविले आहेत. यंत्रणेचे सखोल ज्ञान नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. काम करणाऱ्यांना हळूहळू माहिती होईल, तसे निर्दोष प्रस्ताव तयार होऊ लागतील. या यंत्रणेतील जास्तीत जास्त त्रुटी दूर करण्यासाठी शहर विकास आराखडा अत्याधुनिक होणे आवश्‍यक आहे.

ऑनलाइन सिस्टिम चांगली आहे. त्यातून सर्वांचाच कामाचा ताण कमी होईल. फक्त ती राबविली जात असताना थोडा वेळ लागेल. आर्किटेक्टना त्याची माहिती होईल, तशी ती सोपी बनत जाईल.

- रमेश मस्कर, उपशहररचनाकार

काही अडचणी पहिल्या टप्प्यात येणार आहेत. पण, त्या दुरुस्त करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आमची संस्था त्रुटी दूर करण्याबाबत तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यासाठी पुढाकार घेईल.

- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, ‘क्रेडाई’, कोल्हापूर

१ जुलैपूर्वी ऑफलाईन आलेले प्रस्ताव- २४५६

तीन महिन्यांतील स्थिती

बांधकाम परवानगी- ७०

मुदतवाढ, नूतनीकरण, जोता चेकिंग, भोगवटा आदींसह एकूण- १७३

नगररचनेचा स्टाफ

कनिष्ठ अभियंता- ६

सर्वेअर- १ (दोघांकडे अतिरिक्त कार्यभार)

उपशहररचनाकार- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.