कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) किती महत्त्व असेल हे सांगता येणार नाही.
कोल्हापूर : जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) दोन्हीही जागा शिंदे गटालाच असतील, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली असली तरी त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीतूनच होणार आहे. लोकसभेची निवडणूक भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे एका-एका जागेवरील विजयाची आखणी करताना अनेक बाजूंनी विचार केला जाणार आहे. त्यामुळे जागा कोणाला मिळणार यापेक्षा विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवणे हेच मोठे आव्हान असेल.
महायुतीच्या (Mahayuti) रविवारी (ता. १४) झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा शिंदे गटाला असतील असे जाहीर केले. प्रत्यक्षात याच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जागेबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाही. या निर्णय प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) किती महत्त्व असेल हे सांगता येणार नाही. दुसरीकडे जागा जरी शिंदे गटालाच मिळाल्या तरी उमेदवारी विद्यमान खासदारांनाच मिळेल का नाही याविषयीही संभ्रमावस्था आहे.
वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या संकेतानुसार दोन्ही खासदारांच्या कामाविषयी नकारात्मक मत आहे, त्यामुळे जागा जरी शिंदे गटाला मिळाली तरी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल का नाही हे सांगणे अवघड आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीवरून पालकमंत्री मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील विरूध्द खासदार प्रा. संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील मनभेद अजून दूर झालेले नाहीत. शेतकरी संघात प्रा. मंडलिक, आबिटकर यांना डावलून सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने हे मतभेद अजूनही कायम असल्याचे स्पष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर प्रा. मंडलिक यांना उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या विजयासाठी मुश्रीफ, के. पी. राबतील का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी त्यांच्या विजयाची जबाबदारी मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्यावरच असेल. या घडामोडी पाहता अगोदरच जागा वाटपाचा निर्णय जाहीर करून मुश्रीफ यांना कोणाला शह तर द्यायचा नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्यादृष्टीने कागलचे राजकारण महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांच्याकडून वारंवार माजी आमदार संजय घाटगे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला जात आहे. आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये, असे ते म्हणतात, पण याच संजय घाटगे यांचे प्रा. मंडलिक यांच्याशी तालुक्याच्या राजकारणात मतभेद आहेत. दुसरीकडे घाटगे हे लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना मुश्रीफ यांनी दोन्ही जागा शिंदे गटाला मिळतील, असे सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.