महाविकास आघाडी झाली तर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीही (शरद पवार गट) काँग्रेससोबत राहू शकते.
कोल्हापूर : जिल्ह्यात ज्या-ज्या वेळी काँग्रेसचे (Congress) नेते एकत्र आले, त्या-त्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील जिल्ह्यातील फुटीचे चित्र पाहता आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार पी. एन. पाटील हे दोन्ही नेते एकजुटीने कार्यरत राहिले तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येऊ शकतात.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची तालुकानिहाय आढावा बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रोखठोक मते मांडली. देशात भाजपची आणि राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची सत्ता आहे.
सत्ता नसतानाही काँग्रेसच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी निश्चिपणे काँग्रेसला वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ शकते. कार्यकर्ते नेत्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. आता नेत्यांनीही एकमेकांच्या शब्दाला किंमत दिली तर काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठी अपेक्षा करता येऊ शकते, असाच सूर या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून उमटत होता.
जिल्ह्यात काँग्रेसमध्ये पी. एन. पाटील (P. N. Patil) यांच्याकडून दुखावलेल्या कार्यकर्त्यांना सतेज पाटील सांभाळून घेत होते, तर सतेज पाटील यांच्याकडून नाराज झालेला कार्यकर्ता पी. एन. पाटील यांच्या गटात सक्रिय होत होता. याची दोघाही नेत्यांना सल होती. पी. एन. पाटील आणि सतेज पाटील या दोन्ही नेत्यांच्या सुप्त वादाचा अनेकांनी फायदा घेत राजकीय पोळी भाजली.
दोन्ही नेत्यांनी हसतखेळत का असेना आपल्या मनात दाटलेले अनेक वर्षांपासूनचे मळभ काल बाहेर काढले. काँग्रेसच्या या नेत्यांना आता औपचारिक नात्यापेक्षा आत्मीयतेचे नाते निर्माण करावे लागणार आहे. यामुळे तळागाळात काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला बळ मिळणार आहे.
सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे अनेक ग्रुप आहेत. याच ग्रुपमध्ये पी. एन. पाटील यांच्यापेक्षा सतेज पाटील कसे श्रेष्ठ किंवा सतेज पाटील यांच्यापेक्षा पी. एन. पाटील कसे श्रेष्ठ हाच वाद पाहायला मिळत आहे. हा वाद आणि ही सुप्त फूट थांबवायची असेल तर दोन्ही नेत्यांची एकजूट काँग्रेसच्या आणि पर्यायाने नेत्यांच्याही फायद्याची ठरणार असल्याचे चित्र आहे.
राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आहे. ही फूट जिल्ह्यातही दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादीमध्ये कोण-कोणाच्या गटात हे ठामपणे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे, तर शिवसेनेत उध्दव ठाकरे गटाला मानणारा गट कायम राहील, असे चित्र आहे. एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते हे वैयक्तिक नेत्यांचा गट म्हणून सक्रिय आहेत. त्यांना शिंदे गटाचे शिवसैनिक म्हणता येईल का, हा प्रश्न आहे.
त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसलाच मोठी संधी आहे. महाविकास आघाडी झाली तर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीही (शरद पवार गट) काँग्रेससोबत राहू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी डोक्यात घेतलेली लोकसभा निवडणूक नेत्यांना डोक्यावर घ्यावी लागणार आहे. तरच हे चित्र काँग्रेसच्या बाजूने दिसून येण्यास मदत होणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यात पी. एन. पाटील यांच्यामागे आणि आमदार पी. एन. पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांच्या मागे आपली ताकद लावल्यामुळे दोन्ही नेत्यांचा विजय सोपा झाला. एवढेच नव्हे तर हातकणंगले विधानसभेला काँग्रेस उमेदवार विजयी होण्यासही मदत झाली. हे चित्र पुन्हा येण्यासाठी नेत्यांना एकत्र काम करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.